गोंदिया बरौनी एक्स्प्रेस ट्रेनमधून १० लाखाचे चांदिचे दागिने जप्त

0
63

गोंदिया-बरौनी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या कडून १० किलो ३६८ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. पुढील कारवाईसाठी नागपूर आयकर विभागाला कळवले. ९ एप्रिलरोजी रात्रीच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली आहे. नरेश कन्हैयालाल वलेछा (६२) रा. सिंधी कॉलनी आणि विष्णू गोपीचंद नागभिरे (५४) रा. श्रीनगर वॉर्ड गोंदिया ही संबंधित प्रवाशांची नावे आहेत.
विभागीय कार्य दल निरीक्षक प्रभारी कुलवंत सिंग, उपनिरीक्षक राहुल पांडे, सहायक उपनिरीक्षक धर्मेंद्र कुमार, हवालदार विशाल थावरे, उपनिरीक्षक दीपक कुमार, हेड कॉन्स्टेबल निखिलेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया रेल्वे स्थानकावर बरौनी एक्स्प्रेसची तपासणी केली. त्यातील नरेश वलेछा आणि विष्णू नागभिरे या दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली असता त्याच्या पिशवीत १० किलो ३६८ ग्रॅम चांदीचे दागिने सापडले, ज्याची अंदाजे किंमत ९ लाख ७४ हजार ५९२ रुपये आहे. त्याच्या कडे या दागिन्यां संदर्भात चौकशी केली असता कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. दोन्ही प्रवाशांकडून वरील चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून ते नागपूर आयकर विभागाकडे चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत.