आंतरराज्यीय तस्करास मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवरून अटक

0
43

यवतमाळ,दि.११ – जिल्ह्यात पोलिसांनी उघडलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत अंमली पदार्थांच्या तस्कीरीची आंतरराज्यीय साखळी शोधत एका आरोपीस थेट मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवरून अटक केली. अय्युब उर्फ अली खान (४०) रा. बोरखेडा, ता. पिपलोदा, जि. रतलाम (मध्यप्रदेश) असे या तस्कराचे नाव आहे. त्याच्या अटकेनंतर विदर्भातील अंमली पदार्थाच्या तस्करीचे थेट सीमेपार धागेदोरे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कळंब येथून सुरू झालेल्या या प्रकरणी यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत तिघांना अटक करून आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. १५ दिवसांपूर्वी कळंब येथील अंमली पदार्थ प्रकरणात अभय राजेंद्र गुप्ता (३०) रा. बुटीबोरी (नागपूर) याला अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इस्तीयाक हुसेन मुस्तफा हुसेन उर्फ इस्तीयाक खातीब (४५) रा. बडा ताजबाग हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यालाही अटक केली. अंमली पदार्थांच्या तस्करीची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यात विदर्भातील मुख्य तस्कर अय्युब खान उर्फ अली खान याचे नाव तपासात पुढे आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश येथे जाऊन अली खान याची माहिती घेत असता तो मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवरील भावगढ येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, आकाश सहारे, महेंद्र साळवे, मंगेश ढबाले यांनी भावगढ येथे कारवाई करत अय्युब खान उर्फ अली खान याला अटक केली. या कारवाईनंतर विदर्भातील एमडी ड्रग्जचे आंतरराज्यीय रॅकेट पोलिसांच्या निशाण्यावर आले आहे.