गोंदिया,दि.११: जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत सन २०१९-२० मध्ये ग्राम पंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदानातून मंजूर ७६ कामे करण्यात आली. या कामांवर खर्च करण्यात आलेला ३३ टक्के निधी शासन, प्रशासनाकडून थकविण्यात आला होता. त्यामुळे साहित्य पुरवठा करणारे अडचणीत आले होते. या संदर्भात जि.प.चे उंबरठे झिजवूनही दुर्लक्ष करण्यात आले.
परिणामी प्रहारने याविरूध्द एल्गार पुकारून वाचा फोडली. निधी द्या, अन्यथा आत्महत्या करण्याची परवागनी द्या, असा इशारापर पत्र प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी जिल्हाधिकारीमार्फत राष्ट्रपतींना दिले होते. या पत्राची दखल घेत जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकार्याने आवश्यक कारवाई करून १५ दिवसात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे प्रलंबित असलेल्या निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या संदर्भात अनेकदा पाठपुरावा करूनही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. सतत टाळाटाळची भुमिका घेवून प्रशासनाकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराला संतापून प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी थकीत निधी वितरीत करण्यात यावे अन्यथा ७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या दालनात आत्महत्येची परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना पाठविले होते. त्याचबरोबर या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचे कारणीभूत ठरवून संबधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याची सेवा समाप्त करुन शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.