जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १०८ उद्योजकांसोबत सामंजस्य करार !
गुंतवणूकदारांना सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• • सुमारे अडीच हजारपेक्षा अधिक रोजगार निर्मिती
• उद्योगांमध्ये सौरऊर्जा वापरला प्राधान्य देण्याचे आवाहन
लातूर, दि. १२ : जिल्ह्यातील गुंतवणूक वाढावी, उद्योगांना चालना मिळावी आणि त्यामधून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी गुंतवणूकदारांना विविध सोयी-सुविधा कालबद्ध स्वरुपात देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सातत्याने पुढाकार घेत उद्योजकांना बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही जिल्ह्यात येणाऱ्या गुंतवणूकदारांना पाठबळ दिले जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी हॉटेल ग्रँड सरोवर येथे आयोजित लातूर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. यावेळी ‘मैत्री’ संस्थेचे सागर आवटी, आकाश ढगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे, व्यवस्थापक प्रवीण खडके, गोपाल पवार, बबन कांबळे, टपाल विभागाचे मोहन सोनटक्के, भारतीय स्टेट बँकेचे बालाजी गोपाल एमसीईडीचे प्रादेशिक अधिकारी सुदाम थोटे, दीपक जोशी यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.
जिल्ह्यात गुंतवणूक वाढीसाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सारख्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गेल्या तीन वर्षात लातूर जिल्हा सातत्याने राज्यात अग्रेसर आहे. उद्योग क्षेत्राला चालना देणारा जिल्हा अशी लातूरची ओळख निर्माण व्हावी, यासाठी प्रशासकीय पातळीवरून सातत्याने पुढाकार घेतला जात आहे. गेल्या दोन महिन्यात तीन वेळा उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्या सोडविणे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच उद्योजकांना आवश्यक विविध परवानग्या गतीने आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.