नवी दिल्ली : डाउनडिटेक्टरच्या (Downdetector) आकडेवारीनुसार, दुपारपर्यंत UPI सेवेबाबत सुमारे 1,168 तक्रारी नोंदवण्यात आल्या. यापैकी 96 वापरकर्त्यांनी गुगल पे वर आणि 23 वापरकर्त्यांनी Paytm वर समस्या नोंदवल्या. या विषयावर UPI कडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही, परंतु गेल्या, काही दिवसांत ते अनेक वेळा क्रॅश झाले आहे.
शनिवारी, देशभरातील UPI वापरकर्त्यांना पुन्हा एकदा डिजिटल पेमेंटमध्ये समस्यांचा सामना करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे, UPI सेवा तात्पुरती बंद करण्यात आली, ज्यामुळे लाखो वापरकर्त्यांचे व्यवहार अयशस्वी झाले. गेल्या दोन आठवड्यात UPI मध्ये इतकी मोठी तांत्रिक समस्या येण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी, 26 मार्च आणि 2 एप्रिल रोजी अशाच प्रकारच्या समस्या नोंदवल्या गेल्या होत्या. वापरकर्त्यांच्या तक्रारींवर आधारित सेवा खंडित होण्याचे निरीक्षण करणारे प्लॅटफॉर्म, डाउनडिटेक्टरच्या मते, शनिवारी सकाळी 11:30 नंतर UPI व्यवहार अयशस्वी झाल्याच्या तक्रारी सतत येऊ लागल्या.
एनपीसीआयने दिले स्पष्टीकरण!
UPI चालवणारी संस्था NPCI ने ही समस्या मान्य केली आहे आणि म्हटले आहे की, ‘NPCI सध्या तांत्रिक अडचणींना तोंड देत आहे, ज्यामुळे काही UPI व्यवहार अयशस्वी होत आहेत. आमची टीम लवकरच, ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’ हे विधान NPCI ने त्यांच्या X हँडलवर शेअर केले आहे.
सामान्य वापरकर्ते आणि व्यापाऱ्यांच्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेवर परिणाम!
यापूर्वी, 26 मार्च रोजी देखील, UPI सेवांमध्ये मोठ्या तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला होता जेव्हा वेगवेगळ्या UPI ॲप्सचे वापरकर्ते सुमारे 2 ते 3 तास व्यवहार करू शकले नाहीत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ही समस्या तांत्रिक अडचणींमुळे निर्माण झाली होती, ज्यामुळे देशभरातील सामान्य वापरकर्ते आणि व्यापाऱ्यांच्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेवर परिणाम झाला.
देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा!
आयएमपीएस पायाभूत सुविधांवर आधारित, यूपीआय ही भारतातील सर्वात जलद आणि सोपी त्वरित पेमेंट प्रणाली आहे. याद्वारे, वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कधीही आणि कुठेही त्वरित पैसे हस्तांतरित करू शकतात. लहान-मोठ्या दुकानांमध्ये तसेच बिल पेमेंट आणि सबस्क्रिप्शन सारख्या सुविधांमध्ये UPI चा वापर खूप सहजपणे केला जातो. यामध्ये ऑटोपे फीचरची सुविधा देखील आहे, ज्याद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंट वेळेवर आपोआप होते.
मार्चमध्ये UPI ची विक्रमी कामगिरी!
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मार्च 2025 मध्ये, UPI व्यवहारांचे एकूण मूल्य 24.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. फेब्रुवारीच्या तुलनेत हा आकडा 12.7% जास्त आहे. फेब्रुवारीमध्ये एकूण व्यवहार 21.96 लाख कोटी रुपये होते. यावरून स्पष्ट होते की, आज भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत UPI किती महत्त्वाची भूमिका बजावत आहे, तथापि, सर्व्हर डाउनसारख्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे वापरकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत आहे आणि दैनंदिन व्यवहारांवर गंभीर परिणाम होत आहे.