गोंदिया : आरोग्य अभियानात १० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित विविध पदावर समायोजन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. दि. १४ मार्च २०२४ नुसार एकूण ७१ संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे ठरले होते. त्यानुसार दोन संवर्गातील ३१ कंत्राटी वाहन चालक, तर कंत्राटी सपोर्ट स्टाफ असे एकूण ३४४ जणांना वर्ग ४च्या पदावर सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले. परंतु ६९ संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश दिले नाहीत. त्यासाठी दि. १६ व १७एप्रिल २०२५ रोजी एनएचएम कर्मचारी आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांना निवेदन दिले.शिष्टमंडळात यांचा समावेश पवन वासनिक, स्वप्नाली ठवकर, संजय बिसेन, अमित मंडल, डॉ. मीना वट्टी, अर्चना वानखेडे, संतोष बोरकर, अनिल रहमतकर, अविनाश वन्हाडे, बबिता रहांगडाले, डॉ. योगेश पटले, निशांत बन्सोड, विद्या रहांगडाले, कल्याणी चौधरी, भुमेश्वरी न्यायकरे व कर्मचारी यांचा समावेश होता.
शासनाने निवेदनाची दखल न घेतल्यास दि. १६ व १७ एप्रिल २०२५ रोजी धरणे आंदोलन व त्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २३ एप्रिलपासून बेमुदत उपोषण केले जाणार आहे. त्वरित वेतन सुसूत्रीकरण लागू करण्यात यावे, २ महिन्याचे थकित वेतन अदा करण्यात यावे, ३-६ महिन्यांचे थकीत दैनिक भत्ता व इंधन भत्ता देयक अदा करण्यात यावा, समान काम समान वेतन तत्काळ लागू करण्यात यावे, १० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे विनाविलंब सेवा समायोजन करणे, सर्व कर्मचाऱ्यांना ईपीएफ योजना लागू करणे, सर्व कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा कवच लागू करणे, ३७ दिवसांचे वेतन आंदोलन कालावधीतच मंत्रालयीन बैठकी दरम्यान ठरल्याप्रमाणे तत्काळ अदा करणे, आंदोलन काळातील कर्मचाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी गृहविभागाकडे पत्र पाठविण्याचे ठरलेले होते. अजूनपर्यंत सार्वजनिक विभागाकडून पत्र गेलेले नसून तत्काळ गृहविभागाकडे गुन्हे रद्द करण्यासाठी पत्र पाठविण्यात यावे, अन्यायकारक बायोमेट्रिक हजेरी व फेस रिडिंगप्रणाली तत्काळ रद्द करणे या मागण्यांचा समावेश होता.