2026 पर्यंत शेतक-यांना 12 तास मोफत सौर वीज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
48

वर्धा, दि. 1४ एप्रिल 2025: डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील तब्बल 80 टक्के शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाला 12 तास मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री फडणवीस  आर्वी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यादरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी शेतीसाठी पाणी आणि वीज उपलब्ध करून देण्यावर शासनाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.

 यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते नेरी (मिर्झापूर) येथील प्रधानमंत्री सुर्यघर – मोफत वीज योजनेंतर्गत विकसित सौरग्रामचे लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आणि तब्बल 720 कोटी रुपयांच्या विकासकामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजनही संपन्न झाले. याप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे यांच्यासह आमदार दादाराव केचे, समीर कुणावर, सुमीत वानखेडे, राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरीता गाखरे, सुनील गफाटआणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नेरी (मिर्झापूर) येथील गावकऱ्यांना आता पूर्णपणे मोफत वीज मिळणार आहे. लवकरच प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत राज्य शासनाच्या योजनेची भर घालून संपूर्ण राज्यातील तसेच 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल.

 शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यांची अंमलबजावणी सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांची दिवसा 12 तास वीज पुरवठ्याची मागणी होती. सध्या शेतीसाठी दिवसा 16 हजार मेगावॅट विजेची गरज भासते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून, याच प्रयत्नांचा भाग म्हणून डिसेंबर 2026 पर्यंत 80 टक्के शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाला 12 तास मोफत वीज मिळणार आहे, असे त्यांनी आश्वस्त केले.

 राज्य शासनाने 2025 ते 2030 या काळात दरवर्षी राज्यातील वीज ग्राहकांच्या बिलात घट करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी दरवर्षी वीज दरात वाढ होत होती, मात्र आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज दर कमी करण्याचे नियोजन केले जात आहे आणि असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असे त्यांनी गौरवाने सांगितले. आगामी काळात सर्वांनी प्रधानमंत्री सुर्यघर – मोफत वीज योजनेचा लाभ घेतल्यास वीज बिलाची समस्याच उरणार नाही, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. याव्यतिरिक्त, आता शेतीच्या सिंचनासाठी 10 हॉर्स पॉवर पर्यंतच्या सौर कृषी पंपांना परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महानिर्मितीच्या मदतीने निम्न वर्धा प्रकल्पावर तरंगता सौर प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातून 500 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे उन्हाळ्यात होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होईल आणि वीजही स्वस्त मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रत्येक गरीब कुटुंबाच्या घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून दिले जाणार असल्याने त्यांनाही वीज बिलाचा भार सोसावा लागणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.