-विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्रात विद्यार्थी कृती समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम
नागपूर : (१४-४-२०२५)लक्ष निर्धारित करीत पाठलाग कराल तेव्हाच यश मिळेल, असे प्रतिपादन माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्र येथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. १४ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे मार्गदर्शन करीत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे होत्या, प्रमुख अतिथी म्हणून राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य प्रथमेश फुलेकर, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ, विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष प्रशिक खोब्रागडे यांची यावेळी उपस्थिती होती. अभ्यास करण्याची जिद्द असेल तर विद्यार्थी कोणत्याही स्थितीत, कोणत्याही ठिकाणी अभ्यास करीत यश मिळवतो. याकरिता अभ्यास करण्याची चिकाटी हवी असल्याचे असे पुढे बोलताना कुलगुरू म्हणाल्या. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी २५ तासाचा व्यवस्थित वापर करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे. 

त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे आकलन आवश्यक आहे. अभ्यासक्रम हाताने अभ्यास करतो तेथे लिहून ठेवा. अभ्यास तसेच निकाल या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. बेस येत नसेल तर पुढील कठीण अभ्यासक्रम येणार नाही. त्यामुळे प्रथम सोपे वाचा, नंतर पुढे जा, असे कुलगुरू म्हणाल्या. समाज माध्यमांचा वापर न करता आपल्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विद्यार्थ्यांना सहकार्य केले पाहिजे, असे देखील त्या म्हणाल्या.
प्रमुख अतिथी राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याचे आवाहन केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची माहिती देत त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरव केल्याची माहिती देत शिक्षणाने ज्ञानाचे दरवाजे उघडे होतात हे त्यांनी दर्शवून दिल्याचे डॉ. बनसोड म्हणाले. त्याचप्रमाणे आजच्या युगात अनेक प्रकारे तणाव येतात. या तणावातून आपणास कसे दूर होता येईल याचे स्व-तंत्र विकसित करण्यावर भर द्यावा, असे देखील डॉ. बनसोड म्हणाले. २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तक मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अधिसभा सदस्य प्रथमेश फुलेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची माहिती देत समाजामध्ये शिक्षणाची द्वारे कशाप्रकारे उघडी केली याची माहिती दिली. विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी म्हणून विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मोबाईल ॲप देखील विद्यापीठाने सुरू केला आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
प्रास्ताविक करताना ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ग्रंथालयात ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळायला हवे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात प्रथमच असा योग घडून आल्याची माहिती डॉ. खंडाळ यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन सुझोन मेश्राम यांनी केले तर आभार शशी शर्मा हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृती समितीचे अध्यक्ष प्रशिक खोब्रागडे, सचिव प्रकाश वाघमारे, सदस्य सुझोन मेश्राम, योगेश्वर काटेकर, अतुल बागडे, आरजू शेंडे, वैशाली पाटील, दत्ता पराचे, चेतन बनसोड, मनीष जाधव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
*स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार*
विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्रात सराव करीत स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये नवीन गेडाम, मंगेश राठोड, अनिरुद्ध चांभारे, प्रफुल्ल झाडे, खुशाल युवनाते, पंकज तागडे, सुलोचना पवार, सनी रामटेके, राहुल मेश्राम, डिकेश रहांगडाले, स्वप्निल बेलखोडे, भूमेश्वर मेंढे, ॲड. शांताराम मोरे, योगेश वाघमारे, नीता मडावी आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सत्कार कार्यक्रमाचे संचालन राशी कडू या विद्यार्थिनीने केले.