आजपर्यंत संधी न मिळालेल्या कुणबी,एसस्सी,एसटी समाजाला भाजप देणार का अध्यक्षपद?

0
72
भाजप जिल्हाध्यक्ष -स्व.राकेश शर्मा,स्व.दयाराम कापगते,विनोद अग्रवाल हेमंत पटले,केशवराव मानकर,येशुलाल उपराडे.
गोंदिया,दि.१७ः -लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत एकहाती विजय मिळवणार्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका ते राष्ट्रीयस्तरापर्यंतच्या संघटनात्मक निवडणूकीला सध्या वेग आलेला आहे.महाराष्ट्रात येत्या दिवाळीच्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था्च्या निवडणुका लक्षात घेत तालुका व शहराकरीता ४५ वर्षापेक्षा अधिक वयाचा तर जिल्हास्तरावर ५५ वर्षापेक्षा अधिक वयाचा अध्यक्ष निवडू नये अशा आलेल्या सुचनेनंतर तालुकास्तरावरील अध्यक्षांची जी नावे निश्चित करण्यात आली होती,ती मात्र पाकिटातच सिलंबद राहिली असून तालुकास्तरावर ४५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचा शोध सुरु करण्यात आला आहे.त्यातच जिल्हास्तरावर सुध्दा ५५ च्या आतील व्यक्तीचा शोध जिल्हाध्यक्ष पदाकरीता भाजपने घेण्यास सुरवात केली आहे.त्यातच आजपर्यंत गोंदिया जिल्हा अस्तित्वात येऊन २६ वर्ष पुर्ण होत आहेत,या २६ वर्षात भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष निवडतांना ओबीसीतील कुणबी,तेलीसह अनु,जाती व जमातीच्या व्यक्तींना अद्यापही जिल्हाध्यक्ष पदावर बसवल्याचे दिसून येत नाही.भाजपने,ब्राम्हण,मारवाडी,कोहळी,पोवार,कलार,लोधी समाजाला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली असून यावेळी पक्ष यावेळी कुणाला संधी देते याकडे लक्ष लागले आहे.लोकसभा निवडणूकीत निकालानंतर भाजपाला अपेक्षित यश आले नव्हते.मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले.लोकसभेतील निवडणूकीच्यावेळी भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने पराभव झाला होता,हे लक्षात येताच विधानसभेच्या वेळी मात्र ती चूक सुधारली गेली.त्यातच आता जिल्ह्यातील ८ तालुक्यातील तालुका अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेने वेग घेतला आहे.सडक अर्जुनी,अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रत्येकी दोन तालुकाध्यक्ष निवडले जाणार आहेत.गोंदिया व तिरोडा येथे ग्रामीण व शहर अध्यक्षासोबंतच मंडळ अध्यक्षाची निवड होणार आहे.तर आमगाव,सालेकसा,देवरी व गोरेगाव येथे एकाची अध्यक्षपदी निवड होणार आहे.गोंदिया तालुक्यात तर ५ मंडळ अध्यक्षांची निवड होणार आहे.

या सर्वनिवडीनंतर येत्या आठवड्यात जिल्हाध्यक्षाच्या निवडीची प्रकिया होणार आहे.भाजपकडे आजच्या घडीला अनेक नेते जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.त्यामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे.मात्र भाजपने ज्या विजय शिवणकरांना आधी लोकसभेचे नंतर विधानसभेचे आश्वासन देत राष्ट्रवादी काँग्रेसमधून घरवापसी करवून घेतली,त्या विजय शिवणकरांच्या हाती मात्र पक्षाने अद्यापही काहीच दिलेले नाही.त्यातच सध्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवड प्रकियेच्या हालचालीमूळे व कुणबी समाजाला अद्यापही भाजपने जिल्हाध्यक्ष पदाची संधी न दिल्याने किमान त्यांना या पदाकरीता तरी भाजप पात्र समजते की त्यांचा वापर फक्त करुन घेते याकडेही लक्ष लागले आहे.त्यातच अनु.जाती जमातीकडेही जिल्हाध्यक्ष पद गेले नसल्याने आणि या पदावर महिलांनाही संधी मिळालेली नसल्याने भाजप या बाबींचा विचार करते काय याकडे बघावे लागणार आहे.अनु.जाती जमातीच्या विचार केल्यास जे.डी.जगणीत,हनवंत वट्टी,श्री.गावराने,शैलेश नंदेश्वर,श्रावण राणा,लक्ष्मीकांत धानगाये अशी अनेक नावे या प्रवर्गातून भाजपच्या राजकारणात सक्रिय आहेत.जे.डी.जगणीत व हनवंत वट्टी यांच्यावर तर भाजपच्यावतीने कौटुंबिक राजकारणाला महत्व दिले गेल्याने अन्याय झाल्याचे बघावयास मिळालेले आहे.यातच ५५ वयाची अट घातल्याने जगणीत,शिवणकरासारखे आधीच यादीतून बाहेर पडल्याने शिवणकरांचा राजकीय वनवास मात्र संपायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.