पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

0
15
‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन;
बुलडाणा, दि. 15 : पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग घेणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्नांशिवाय पाण्याचे व्यवस्थापन करणे शक्य नाही. पाण्याचे संरक्षण ही एक सामूहिक जबाबदारी असून ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात 15 ते 30 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता बापूसाहेब गाडे, अधिक्षक अभियंता श्रीराम हजारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, कार्यकारी अभियंता सु. श. सोळंके, प्र.पु. संत, अ. भा. चोपडे, तु.चं. मेतकर, परमजितसिंग जुनेजा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, जलव्यवस्थापन कृती पंधरवडात सर्वांनी समन्वयाच्या माध्यमातून उद्दिष्टानुसार कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन करावे. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांचाही यात सहभाग घ्यावा. बुलढाणा हा कृषीप्रधान जिल्हा असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती जास्तीत जास्त सिंचनाखाली आणण्यासाठी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यासाठी पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा समावेश करण्याबाबत जनजागृती करावी. उद्योगाना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे काटकसरीने वापर करावा. पाण्याचे शुद्धीकरण करुन पुर्नवापर करावा. पाण्याचे पुरवठा करणारे पाईपलाईन, कालवे यांचे नियमित दुरुस्ती, स्वच्छता ठेवावी. तसेच नागरिकांमध्ये पाण्याचे महत्व व त्यांचे काटकसरीने वापरण्याबाबत जनजागृती करण्याचे सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, मनरेगा अंतर्गत पाणी सर्वधनासाठी विविध उपक्रम प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याचे महत्व समजावणे आणि गावातील पाण्याचे बजेट तयार करणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता असताना पाणी उपचारावरही भर देण्यात यावा. सर्व विभागांनी केवळ 15 दिवस उपक्रम न राबविता वर्षभर निश्चित उद्दिष्ट समोर ठेऊन नियोजनावर भर द्यावाख् असे आवाहन त्यांनी केले. पाण्याचे स्रोत मर्यादित असून पाण्याची मागणी वाढते आहे. ही तफावत दूर करून पाण्याचा कार्यक्षम वापर, पाणी व्यवस्थापनाचे नवे तंत्र आणि बिगर सिंचनाच्या पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने जल व्यवस्थापन कृती आराखडा घरोघरी पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर पोहोचून पाण्याशी निगडित नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी स्वप्रेरणेने सामुहिक प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.
जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल 2025 कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सिंचन व्यवस्था, कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सहभाग घेण्यात येणार आहे, अशी माहिती अधिक्षक अभियंता बापूसाहेब गाडे यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी.टी. शेगोकार यांनी तर आभार प्रदर्शन अ. भा. चोपडे यांनी केले.