जल व्यवस्थापनाविषयी जनजागृती ही काळाची गरज- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी कृतीशील योगदान द्यावे
• शासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी
लातूर, दि. १५: जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज पाण्याची उपलब्धता आणि त्याचा योग्य वापर याबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. तसेच, जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. या पंधरवड्याच्या कालावधीत प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी कृतीशील योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जलपूजनाने या पंधरवड्याचे उद्घाटन झाले. यावेळी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक श्रीमती आर. डी. ठोंबरे, उपअधीक्षक अभियंता श्रीमती एम. व्ही. तोरणाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, अमर पाटील, एम. आर. काळे, एम. एम. महाजन यांच्यासह उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता आणि सिंचन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.
जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत गावोगावी चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवली. तसेच, लातूर पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोटारसायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले.
पंधरवड्याच्या कालावधीत लातूर पाटबंधारे विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश पोहोचवावा. तसेच, पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांची आणि कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन हा पंधरवडा यशस्वी करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत आयोजित उपक्रम
• १६ एप्रिल: जलसंपदा अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे.
• १७ एप्रिल: ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम आणि जल पुनर्भरण (पावसाचे पाणी साठवणे).
• १८ एप्रिल: शेतकरी आणि पाणी वापर संस्थांशी संवाद.
• १९ एप्रिल: भूसंपादन, पुनर्वसन यासंबंधी अडचणींचे निराकरण आणि कालवा संयुक्त पाहणी.
• २० एप्रिल: कालवा स्वच्छता अभियान.
• २१ एप्रिल: उपसा सिंचनाच्या पाणी परवानगीसाठी तक्रारींचे निराकरण.
• २२ एप्रिल: अनधिकृतपणे वाणिज्य आणि औद्योगिक पाणी उपसा प्रकरणांचा शोध घेऊन कारवाई.
• २३ एप्रिल: जलसंपदा आणि कृषी विभागामार्फत पीक पद्धती, उत्पादकता वाढ आणि पाण्याचे नियोजन याबाबत संयुक्त बैठक व कार्यशाळा.
• २४ एप्रिल: सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी, वसुली आणि थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा.
• २५ एप्रिल: विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि सेवाभावी संस्थांशी संवाद व कृती कार्यक्रम.
• २६ एप्रिल: महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणी वापराचा जललेखा तपासणी, तसेच धरणे आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याच्या प्रकरणांचा शोध.
• २७ एप्रिल: आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन (पूर आणि मालमत्तेचे संरक्षण).
• २८ एप्रिल: महसूल विभागाच्या समन्वयाने महामंडळाच्या नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांवर नोंदी घेणे आणि ३१ मेपूर्वी अतिक्रमण काढणे.
• २९ एप्रिल: पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र आणि कार्यशाळा.
• ३० एप्रिल: पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा, महिला मेळावा, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार आणि पंधरवड्याचा समारोप.
