जिल्हा परिषद शाळा आणि मराठी माध्यमात मोठा बदल होणार ! असे असतील महत्वाचे बदल…

0
7691
file photo

गोंदिया,दि.१५ः  महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. पालकांचा कल सीबीएसई तसेच अर्ध-इंग्रजी माध्यमांकडे वाढत चालल्याने पारंपरिक शिक्षण पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे.नवीन बदलांमुळे विद्यार्थ्यांवरचा अभ्यासाचा ताण हलका होणार असून, पाठांतराच्या सवयीला आळा बसणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून नव्या प्रश्नपत्रिका प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे.
श्नपत्रिकांचे नवे स्वरूप
राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा व मूल्यमापन पद्धतीत आमूलाग्र बदल केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत इतर विषयांशी संबंधित प्रश्न असतील. उदा. गणिताच्या प्रश्नपत्रिकेत इतिहासाशी निगडित गणिती उदाहरणे, तर इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत भूगोलातील संकल्पनांवर आधारित आकलन प्रश्नांचा समावेश असेल. या नव्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनशक्तीचा व विचारक्षमतेचा वापर करून उत्तरे लिहावी लागतील. पाठांतरापेक्षा विचारसरणी आणि सृजनशीलता यावर भर दिला जाणार आहे.
उत्तरपत्रिका तपासणीत पारदर्शकता
पहिली ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांची परीक्षा आता शाळास्तरावर होणार असली तरी त्यांच्या उत्तरपत्रिका इतर शाळेतील शिक्षक तपासणार आहेत. यामुळे मूल्यमापन प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि एकसंध निकषांचा वापर होईल.
प्रशिक्षित विषयतज्ज्ञांकडून पेपर सेटिंग
‘यशदा’ संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील विषयतज्ज्ञ शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले आहे. हे शिक्षक नव्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी जबाबदार असतील. यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची समज, विश्लेषण क्षमता आणि उपयोजन कौशल्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

बदलांमागील उद्दिष्ट
राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे, अभ्यासावरील ताण कमी करणे आणि पाठांतरापेक्षा आकलनाला प्राधान्य देणे हा नव्या धोरणामागील मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
या शैक्षणिक क्रांतीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक सशक्त होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या बदलांमधून केला जात असून, भविष्यातील स्पर्धात्मक जगात त्यांना सक्षमपणे उभं करता येईल, असा विश्वास शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दहावी-बारावी परीक्षांचे निकाल वेळेत
दरम्यान यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस आधी पार पडल्या आहेत. बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून, निकाल लवकरच घोषित केला जाणार आहे. १५ मेपूर्वी बारावीचा निकाल, तर २० ते २२ मेदरम्यान दहावीचा निकाल प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.