बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

0
186

गोंदिया, ता. १५ : येथील बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा रुग्णालयात भर्ती केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना १५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. प्रतिभा मुकेश ऊके (वय ३०, रा. सिग्नल टोली, गोंदिया) असे मृताचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रतिभाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबीयांनी करत रुग्णालयात गोंधळ घातला. यावेळी रुग्णालय आवारात काही काळ तणावाचे वातावरण होते.प्राप्त माहितीनुसार मृत प्रतिभाला कळा जाणवल्यानंतर प्रसूतीसाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. ११ एप्रिल रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी कर्तव्यावरील डॉक्टर अनुपस्थित होते. यावेळी तशी माहिती त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी वेळोवेळी देऊन त्यांना रुग्णालयात येण्याची विनंती केली. मात्र, संबंधित डॉक्टर वेळेवर उपस्थित झाले नाही. दरम्यान प्रतिभाला अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रकृति खालावली. याची माहिती डॉक्टरांना देण्यात आली. डॉक्टरांनी रुग्णालय गाठले. मात्र, तोपर्यंत वेळ निघाली होती. यानंतर पुढील उपचारासाठी जवळील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, अधिक रक्तस्त्रावामुळे प्रतिभाचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत रुग्णालयात एकच हल्लाबोल केला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची गंभीरता ओळखत पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालय गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. प्रतिभाचे शव विच्छेदनानंतर मृतदेह कुंटूबींयाच्या स्वाधिन करण्यात आला.