नवेगावबांध येथे निळ्या पाखरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
99

नाऱ्यांनी दुमदुमले नवेगावबांध

अर्जुनी मोरगाव :* तालुक्यातील नवेगावबांध येथील नगर बौद्ध समाजाच्या वतीने प्रशिक बुद्ध विहार येथे विश्वभूषण, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती येथे व परिसरात मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.
जयंती निमित्ताने येथे दि. ११ एप्रिल पासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते.
काल(दि.१४) सायंकाळी पाच वाजता भव्य रॅली काढण्यात आली होती.रॅलीने संपूर्ण नवेगाव दुमदुमले.डीजेच्या तालावर तरुणाईसह,आबाल-वृद्ध निळी पाखरे थिरकत होती.
येथील प्रशिक बुद्ध विहारात सकाळपासूनच परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी निळ्या पाखरांनी एकच गर्दी केली होती. सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य सीमा बडोले यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते भास्कर बडोले,भिमाबाई शहारे,शितल राऊत, समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे,शुभम सांगोळकर,रोशन टेंभुर्णे,सचिन सांगोळकर,नरेश बडोले,प्रा.दिनेशजांभूळकर,डि.डि.भालाधरे,आनंद बडोले पाहुणे म्हणून उपस्थित होते.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमा व महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
सकाळी नऊ वाजता येथील पंचशील बुद्धविहार इंदिरानगर येथे यशवंत साखरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पाहुणे म्हणून, यशवंत शेंडे,नंदलाल उके,यशवंत हुमणे,श्रीकांत हुमणे,हर्षा डोंगरे,भाऊराव साखरे, यशवंत बोरकर,इंदुलकर गुरुजी उपस्थित होते.
येथील जेतवन बुद्धभूमी प्रकल्प येथे ध्वजारोहण मुकेश सांगोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.पाहुणे म्हणून
भूषण टेंभुर्णे,विक्रमशील शहारे,डीगांबर शहारे,रुपेश सांगोळकर, प्रशिक शहारे,रेवचंद शहारे,भीमाबाई शहारे, सुनंदा टेंभूर्णे,हेमचंद्र लाडे उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य रॅली काढण्यात आली. ट्रॅक्टर वर बाबासाहेबांच्या व तथागत गौतम बुद्धांच्या भव्य प्रतिमा विराजमान होत्या.रॅलीचा प्रारंभ प्रशिक बुद्ध विहार येथून होऊन ते बस स्थानक,श्री बालाजी चौक,पंचशील बुद्ध विहार इंदिरानगर येथून परत प्रशिक बुद्ध विहारात रॅलीचे समापन झाले.
रॅलीमध्ये महिला-पुरुष,युवक-युवती ते आबाल -वृद्ध आंबेडकरी अनुयायांबरोबरच,गावकरी सुद्धा मोठ्या हिरीहीरीने सामील झाले होते.
एकच साहेब,बाबासाहेब,जय जय- जयभीम,बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,जब तक सुरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा आदी घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.
डीजेच्या तालावर तरुणाई बरोबरच आबाल,वृद्धांनी देखील ठेका धरला.माझ्या भिमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर,संविधानाचे पुस्तक हातात,भीमराव बसले रथात,
किती शोभला असता भिम नोटावर,टाय आणि कोटात,जय जय महाराष्ट्र माझा,दोनच राजे इथे गाजले,सुटा बुटात शोभून दिसतो,भीमराव साऱ्यात एक नंबर,भीम माझा गं,दिल्लीत भाषण देई,आहे कुणाची योगदान लाल दिव्याच्या गाडीला आदी भीम गीतांवर बाबा आजचे आमचे जगणे ही तुझी देण आहे,अशी बाबासाहेबांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करीत,डीजेच्या तालावर निळ्या पाखरांनी ठेका धरला.संपूर्ण जयंती सोहळा शांततेत पार पडला.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथील पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.