अमरावती : अमरावती विमानतळावर आज अखेर पहिले बहुप्रतीक्षित व्यावसायिक विमान उरतले. सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी अलायन्स एअरच्या ७२ आसनी विमानाने धावपट्टीवर लॅण्डिंग केले.
विमान उतरताच अग्निशमन दलाने पाण्याचे उंच फवारे मारून पहिल्या विमानाचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर एअर इंडियाच्या विमान प्रशिक्षण संस्थेच्या (एफटीओ) विमानाने प्रात्यक्षिक उड्डाण घेतले. मुंबईहून अमरावती विमानतळावर पोहोचलेल्या या पहिल्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रवास केला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला कार्यक्रमाला नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावतीत-मुंबई प्रवासासाठी प्रातिनिधिक स्वरूपात तीन प्रवाशांना बोर्डींग पास प्रदान करण्यात आले. नंतर ७२ प्रवाशांना घेऊन पहिले विमान मुंबईकडे झेपावले.या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, अमर काळे, डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, परिवहन विभागाचे मुख्य सचिव संजय सेठी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे उपस्थित होत्या. अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस राहणार आहे.