तत्पुर्वी नाल्यावरील अतिक्रमणांवर कारवाईची विशेष मोहीम
चंद्रपूर 16 एप्रिल – शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या 6 मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेऊन 10 छोट्या नाल्यांचीही स्वच्छता जुन महिन्यापर्यंत करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. मंगळवार 15 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता कामाचा आढावा घेतांना नाले स्वच्छता मोहीमेआधी नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते,याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो झाल्यास परिसरात पाणी शिरून साधन संपत्ती व आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ज्या नागरिक, दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे त्यांनी ते त्वरित काढण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. नाल्यावरील अतिक्रमण हे पाणी तुंबण्याचे कारण ठरू शकत असल्याचे लक्षात घेता मनपातर्फे नाल्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्यात आला होता. यात गडर लाईन कव्हर करणे,पक्के बांधकाम करणे,व्हरांडा बांधण्यासारखे अतिक्रमण केलेले आढळुन आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम आता राबविण्यात येणार आहे.
शहरातील तीनही झोनअंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता करण्याच्या कामाला सुरवात करण्यात येत आहे.
शहरातील महाविदर्भ वृत्तपत्र कार्यालय ते मच्छीनाला, सावरकर नगर, बगड़खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर , सिस्टर कॉलोनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एस.पी कॉलेज ते नगराळे दवाखाना इत्यादी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व जेसीबी च्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जाणार आहे. त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल, सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल.
नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होणार आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमीत 315 सफाई कर्मचारी व अतिरिक्त 130 असे एकुण 445 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरीता 5 जेसीबी लावण्यात आल्या असून लवकरच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे.
यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली आहे. विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता विभाग हे उद्दिष्ट साध्य करणार आहे. नाले स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे स्वच्छता निरिक्षक, आपत्ती व्यवस्थापन पथक सांभाळणार असुन नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.