गोंदिया –तिरोडा तालुक्यातील वडेगावसह परिसरातील तब्बल २५ गावांचे आरोग्य बंद झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे धोक्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय आणि मनस्ताप वाढत असतानाही सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दि. 15 एप्रिल रोजी वडेगाव येथे लोकसभा खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्यासोबत भेट देत आरोग्यसेवेचा आढावा घेतला.
वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे या भागातील रुग्णांना 12 किलोमीटर दूर असलेल्या तिरोडा येथे जावे लागत आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून, काही वेळा गंभीर रुग्णांवर वेळेवर प्राथमिक उपचारही होत नाहीत. शेतीकामातील अपघात, सर्पदंश, ताप, बाळंतपण अशा तातडीच्या सेवा मिळणे कठीण झालं आहे.
वडेगाव परिसरात सत्ताधारी पक्षाशी संलग्न अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी असतानाही आरोग्य सुविधेच्या या दयनीय स्थिमंगळवारतीकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे. केवळ निवडणुकीच्या काळात आश्वासने आणि घोषणा देऊन नंतर पाठ फिरवली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आरोग्यसेवा मिळालीच पाहिजे- खासदार डॉ. प्रशांत पडोळे
मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी वडेगाव परिसराला भेट दिली. त्यांनी स्थानिक नागरिकांची कैफियत ऐकून घेतली. यावेळी नागरिकांनी तात्काळ आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली. डॉ. पडोळे यांनी केंद्र सुरू होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं.
याप्रसंगी त्यांनी परिसरातील लोकांना आरोग्यसेवा मिळालीच पाहिजे, असा पुनरुच्चार करत त्यांनी सरकारकडे त्वरीत कार्यवाहीची मागणी केली. यावेळी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बन्सोड हे देखील उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथे 1985 साली स्थापन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून परिसरातील वीस-पंचवीस गावांच्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळत होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांपूर्वी इमारत जीर्ण झाली, हे जुजबी कारण देत आरोग्य केंद्र अचानक बंद करण्यात आले. पर्यायी व्यवस्था न करता केंद्र बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. वडेगावसारख्या मोठ्या परिसरात आरोग्य केंद्र बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे. मी यासंदर्भात त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधून केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. वडेगावसह परिसरातील नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
तीव्र आंदोलन करू – माजी आमदार दिलीप बन्सोड
गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी याप्रसंगी सांगितले की वडेगाव आणि परिसरातील नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने तात्काळ पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते, मात्र दुर्लक्ष करण्यात आले. काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे. जर लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल आणि त्यासाठी जबाबदार प्रशासन आणि सरकार असेल.