अमरावती, दि. 17: पोलिस दलाला परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाहने देण्यात येत आहे. येत्या काळातही पोलिसांना अत्याधुनिक साधने देऊन सक्षम करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कोंडेश्वर येथे अमरावती ग्रामीण पोलिस दलाची कोंडेश्वर येथील निवासस्थान इमारत, प्रशासकीय इमारत, चारचाकी नवीन वाहने, तसेच शहर पोलिसांचे चारचाकी नवीन वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष आणि महिला विसावा कक्षाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, प्रवीण पोटे-पाटील, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोलीसांच्या आधुनिकीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. आधुनिक संसाधनांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेत भर पडणार आहे. त्यासोबतच पोलीसिंग अधिक गतिमान होईल. आधुनिक साधने पोलिसांनाही सहाय्यभूत ठरणार असल्याने त्यांचे जीवनमान उंचावेल. पोलीस दलात अद्ययावत वाहने दाखल होणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून दर्जेदार घरे बांधण्यात येत आहेत. पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी डीजी लोन स्कीमही सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणाऱ्या पोलीसांनाही उत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. यातील शहर पोलिस दलाचे वातानुकूलित कक्ष, महिला विसावा कक्ष निश्चितच पोलिसांना मदतीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहानूर शासकीय निवासस्थान इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच 18 चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांना कोंडेश्वर येथील निवासस्थानाची चावी सुपूर्द करण्यात आली.