• जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अंतर्गत जलपूजन
लातूर, दि. १७: गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत अहमदपूर तालुक्यातील हांगेवाडी येथील साठवण तलावातील गाळ उपसा अभियानाचा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलपूजनाने या उपक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक अधीक्षक अभियंता श्रीमती रूपाली ठोंबरे होत्या. उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगारकर, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, मयूर महाजन, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रदीप काळे, अमरसिंह पाटील, गटविकास अधिकारी संतोष माने, नाम फाउंडेशन संस्थेचे विलास चामे यांच्यासहनागरिक यावेळी उपस्थित होते.
पाण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि जलसंपत्तीचे जतन करणे, हा जल व्यवस्थापन कृती पंधरवडा आयोजनाचा उद्देश आहे. जलसंपदा विभागाच्या पुढाकाराने या कालावधीत विविध उपक्रम राबवले जात असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व संवादाद्वारे पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. या कृती पंधरवड्यात पाटबंधारे विकास महामंडळाच्या पुढाकाराने कालव्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड, अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण, अतिक्रमण हटवणे आणि मालमत्तेची अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी असे उपक्रम हाती घेण्यात येणार असून यामुळे जलसंधारणास मदत होईल, असा विश्वास सहकारमंत्री श्री. पाटील आणि यावेळी व्यक्त केला.