जून महिन्यात होणार कामाला सुरुवात
नागपूर, दि 19 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आदिवासी समाजाची संस्कृती जगासमोर यावी यासाठी सुराबर्डी येथे भव्य गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारले जाणार आहे. सुमारे १५ एकर जागेवर हे संग्रहालय उभारले जाणार असून, या प्रकल्पाचा आज सादरीकरणाद्वारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आढावा घेतला.
३० मे पूर्वी सर्व प्रक्रियेची पूर्तता करण्यात यावी. जून महिन्यात या कामाची प्रत्यक्ष सुरुवात होणे अपेक्षित आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. विविध ४५ आदिवासी जातींचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पारंपरिक पैलू संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. हे संग्रहालय भविष्यातील पिढ्यांना आदिवासी संस्कृतीचा वारसा समजून घेण्यासाठी आणि जतन करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल. या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री श्री. उईके यावेळी म्हणाले.
गोंड, भिल्ल, कोलाम, कोरकू, वारली, महादेव कोळी, कातकरी, पारधी यासह विविध आदिवासी जातींचे सांस्कृतिक महत्त्व या संग्रहालयात अधोरेखित करण्यात येणार आहे. यात या समाज बांधवांनी स्वातंत्र्यसंग्रामात दिलेले योगदान, इतिहास, प्रथा आणि परंपरा, नृत्य, संगीत, कला, दागिने अशी वैशिष्ट्ये या संग्रहालयात अधोरेखित करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. उईके यावेळी म्हणाले.
सादरीकरणावेळी आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंग, आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता उज्वल डाबे, सहआयुक्त बबिता गिरी, प्रकल्प अधिकारी नितीन इसोकार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक करण्यावर भर
संग्रहालय पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, झाडांची पुरेशी लागवड, सौर ऊर्जा, एआय तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींवर संग्रहालयाच्या निर्मितीदरम्यान विशेषत्वाने भर देण्यात येणार आहे. विशेषतः इमारत निर्मितीसाठी सावनेर स्टोन या दगडांचा प्रामुख्याने वापर करण्यात येणार असल्याचे सादरीकरणाद्वारे सांगण्यात आले.