गोंदिया,दि.१९ : पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील नक्षल प्रभावित दुर्गम, अतिदुर्गम भागांतील जनतेसाठी विशेषतः ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी, युवक-युवतींच्या विकासासाठी पोलिस दादालोरा खिडकी योजना एक हात मदतीचा या योजनेंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यातूनच गुरुवारी (दि.१७) देवरी येथील पोलिस उपमुख्यालयात सर्व सोयीसुविधांयुक्त ‘ज्ञानदीप अभ्यासिकेचे’ नूतनीकरण व ‘सब्सीडरी कॅन्टीनचे’ उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील उपस्थित होते. दादालोरा खिडकी योजनेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणात लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी तसेच नियमित सराव परीक्षा अशी परिपूर्ण तयारी करून घेतली जात असल्याने ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना लाभ होत असल्याचे विद्यार्थी सौरभ लेंडे व मयुरी गावड या प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगतात सांगितले. प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सहायक पोलिस निरीक्षक बस्तवाडे, हवालदार डोईफडे, नेवारे, गावळ, वसीम पठाण, शिपाई विवेक साखरवाडे, गणवीर, चांदेवार यांचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलिस अधिकारी, अंमलदार, अभ्यासिकेतील ३५ विद्यार्थी उपस्थित होते. संचालन सहायक पोलिस निरीक्षक अजित पाटील यांनी केले. प्रास्ताविक सहायक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे यांनी मांडले. आभार पोलिस उपनिरीक्षक रंजित मट्टामी यांनी मानले.
वाचण्यासाठी पुस्तके, बसण्याची सोय केली- विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि प्रेरणादायी अभ्यासाचे वातावरण मिळावे, या उद्देशातून दादालोरा खिडकी योजनेंतर्गत ही अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. अभ्यासिकेत वाचनासाठी आवश्यक पुस्तक संपदा, प्रशस्त बैठक व्यवस्था, पंखे, दिवे अशी पुरेशी सोय करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक भामरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अभ्यासिकेचे महत्त्व अधोरेखित केले.