गोंदिया,दि.१९– राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली असून राज्य शासनाने ६५ नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी उत्पादन व्यापार आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मोठा निर्णय मानला जात आहे.यात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका मुख्यालयाचा समावेश आहे.
या नव्या समित्यांपैकी सर्वाधिक म्हणजे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ८ समित्या स्थापन होणार आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला प्रत्येकी ७, रायगडला ६, पालघरला ५, सांगली व जळगाव जिल्ह्यांना प्रत्येकी ३, तर नाशिक, भंडारा, चंद्रपूर, आणि अमरावती जिल्ह्यांना प्रत्येकी २ समित्या मिळणार आहेत. ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया, नांदेड, बीड, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांना प्रत्येकी १ बाजार समिती देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर कृषी उत्पादनांची विक्री सुलभ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल, असे सांगण्यात येत आहे.