विदर्भातल्या तरुण वकिलाचं भाषण कोलंबिया विद्यापीठात गाजलं…

0
31

कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येथे बाबासाहेबांची जयंती साजरी

नवी दिल्ली– अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी केली गेली. या जयंती कार्यक्रमात सोएस विद्यापीठ लंडन येथून कायद्याचे उच्चशिक्षण पूर्ण केलेले चंद्रपूर जिल्ह्यातील अॅड. दीपक चटप यांना या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून भाषण करण्याचा बहुमान मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातूनही शिक्षण घेतले होते. त्यामुळे कोलंबिया विद्यापीठात साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगाच्या पाठीवर लक्षवेधी ठरली. अमेरिकन तत्वज्ञ डॉ. कॉर्नल वेस्ट यांनी कार्यक्रमाचे बीजभाषण केले. कोलंबिया विद्यापीठ कार्यक्रम संयोजक विकास तातड यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडली. कोलंबिया विद्यापीठात लेहमन ग्रंथालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दीपक चटप यांच्यासह न्यू जर्सी येथील डॉ. विष्णू माया परियार, बोस्टन विद्यापीठाचे पीएच. डी. स्कॉलर दादासाहेब तांडले, राम गौतम, कॅप्टन विजय बांबोळे, डॉ. सलाम शेख, संभाजी भगत यांची मुख्य उपस्थिती होती.

लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे आपल्या खास शैलीतून संविधानिक मूल्यांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. विपीन तातड यांच्या रॅपने कार्यक्रमाला रंगत आली. नवीन कुमार यांच्या कविता लक्षवेधी ठरल्या. यावेळी ॲड. दीपक चटप म्हणाले की, “ विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या लोकशाहीच्या रक्तवाहिन्या आहेत. या सामान्य जनतेसाठी शोषक ठरू नये म्हणून विविधता जोपासणे आवश्यक वाटते. बाबासाहेबांचे विचार व भारतीय संविधान महत्त्वाचे ठरते. भारतीय संविधानाने दिलेला मार्ग धोरणकर्ते स्वीकारत आहेत किंवा नाही? याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करता कामा नये. बाबासाहेबांच्या समताधारित विचारांतून येणारी पिढी सकारात्मक बदल घडवू शकते. अमेरिकेतील मानवी हक्कांची लढाई, हंगेरीतील रोमा, जागतिक कामगार संघटनेची धोरण आणि जगातील दुर्लक्षित घटकांच्या लढ्यांना बाबासाहेबांच्या विचारांतून दिशा मिळत आहे.”भारतातील लोकशाही संदर्भातील विविध आकडेवारी मांडून उपस्थितांचे लक्ष वेधले.

या जयंती कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, न्याय आणि शिक्षणाच्या विचारांना उजाळा मिळाला.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विद्यापीठातील प्राध्यापक अनुपमा राव, डाइवर्सिटी डीन जेनी, लेहमन लाइब्रेरी डायरेक्टर काकोब व लायब्रेरीयन गॅरी हॉर्समन यांनी विशेष सहकार्य केले.