-शिवराय स्टडी सर्कल अंतर्गत व्याख्यानात प्रियेष घोरमोडे यांचे प्रतिपादन
नागपूर :वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमाराची उभारणी केली, असे प्रतिपादन प्रियेष घोरमोडे यांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागाच्या वतीने शिवराय स्टडी सर्कल अंतर्गत सोमवार, दि. २१ एप्रिल २०२५ रोजी आयोजित व्याख्यानात घोरमोडे बोलत होते.
माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.शामराव कोरेटी यांनी भूषविले. व्याख्याते म्हणून प्रियेष घोरमोडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रायन महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आरमार व्यवस्था’ या विषयावर व्याख्यान देताना घोरमोडे यांनी परकीय शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आरमार व्यवस्था कशा प्रकारे उभी केली याची माहिती देत त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन देखील समजावून सांगितला. पर्यावरणाचा समतोल साधून आरमारी बेडा उभा केला. तत्कालीन शासनकर्त्यांमध्ये आरमार निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सुसज्ज आरमार निर्माण करून परकीय शक्तींना विचार करण्यास भाग पाडले. महाराजांनी आरमार उभे करून स्वराज्याला नवी दिशा दिली. पोर्तुगीज, इंग्रज, डच व सिद्धी या परकीय शत्रूंपासून आपल्या स्वराज्याचे संरक्षण केले. शत्रूपासून स्वराज्याचे संरक्षण करायचे झाल्यास आपली स्वतःची स्वतंत्र आरमार व्यवस्था असली पाहिजे, अशा विचारांचे छत्रपती होते, असे घोरमोडे म्हणाले. छत्रपतींनी आरमारी व्यवस्थेतील पारंपारिक पद्धतीपेक्षा अमुलाग्र परिवर्तन केले. जहाज बांधणी, जहाजा करिता सुरक्षित बंदरे, जहाज दुरुस्तीची केंद्रे तसेच जहाजांकरिता लागणारे सुसज्ज सैनिक या सर्व बाबींचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारकाईने विचार केला होता, असे घोरमोडे यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी डॉ. रायन महाजन यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण, त्यांचे बालपण, शिक्षण व त्यांना मिळालेल्या संस्कारातून पुढे स्वराज्याची निर्मिती करू शकले, असे मत व्यक्त केले. महाराजांनी काळाची पावले ओळखून नाविक दल सुसज्ज असले पाहिजे याकरिता आरमारी बेडा उभा केला. या बेड्यात जवळपास ४०० लहान -मोठे जहाज उपलब्ध होते. समुद्रातून प्रवास करताना जहाजांना दिशा देण्यासाठी दिशादर्शक यंत्रे बसविली होती तर दुर्बिणीचा सुद्धा वापर त्या काळात केला होता. याशिवाय जहाज बांधताना कोणत्या लाकडाचा वापर केला पाहिजे याची शास्त्रशुद्ध माहिती महाराजांनी घेतली होती. स्वराज्यावर समुद्राच्या मार्गे होणाऱ्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी महाराजांनी जलदुर्गाची एक साखळी निर्माण केली यातून स्वराज्याचे संरक्षण झाले, असे महाजन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शामराव कोरेटी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले आरमार पूर्णतः पर्यावरण पूरक होते. जहाज बांधणी करता फळांची झाडे तोडायची नाही, हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. त्याशिवाय जहाज थांबण्याचे केंद्रे सतत बदलत असत कारण या केंद्रालगतच्या गावातील लोकांना त्रास होऊ नये हा यामागील दृष्टिकोन होता, असे डॉ. कोरेटी यांनी सांगितले. सागवानाच्या लाकडांपासून जहाजाची बांधणी केली जात होती. कारण ते दीर्घकाळ टिकतात. समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंपासून आपल्या स्वराज्याचे संरक्षण केले, एवढेच नव्हे तर आपल्या भारतीय समाजात समुद्र प्रवासाबाबत एक अंधश्रद्धा होती ती महाराजांनी स्वतः समुद्र प्रवास करून खोडून काढली, असे मत मांडले. या कार्यक्रमाचे संचालन यश बलवीर यांनी केले तर आभार चेतन तिडके यांनी मानले.