नाकाडोंगरीजवळ भीषण अपघात : तीन जणांचा मृत्यू, एक गंभीर

0
67

तुमसर,ता. 22 एप्रिल (प्रतिनिधी) – तुमसर ते मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नाकाडोंगरी समोर पाथरी गावाजवळील रामनगर येथे सोमवार रात्री सुमारे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान दुर्दैवी अपघात झाला. या भीषण अपघातात पाच वर्षीय चिमुकलीसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले

प्राप्त माहितीनुसार, चिखला (माईन) येथील कैलाश मरकाम, त्याची पत्नी पार्वता कैलाश मरकाम, शेजारी सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली आणि तिची पाच वर्षीय मुलगी यामीनी दुर्गाप्रसाद कंगाली हे दुचाकीने मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न कार्य पार पडल्यावर ते रात्री आपल्या गावी परतत असताना रामनगरजवळ दुर्दैवी घटना घडली.

नाकाडोंगरी जवळील चांदमारा येथे मध्यप्रदेशातील हेटी गावाहून आलेल्या वरातीमध्ये छतेरा येथील बोलेरो वाहन (चालक – दिनेश गौपाले) सहभागी झाले होते. माहितीप्रमाणे, चालकाने लोभीजवळ एका इसमास धडक दिली, ज्यामुळे संबंधित इसमाने जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. गोंधळात बोलेरो सुसाट मध्यप्रदेश कडे निघालाी यातचं रामनगर जवळ वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला अमोरा समोर जबर धडक दिली.

या भीषण अपघातात कैलाश मरकाम, पार्वता मरकाम आणि चिमुरडी यामीनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुषमा कंगाली ही गंभीर जखमी झाली असून तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती आहे.

या अपघातामागे रस्त्याचे अपूर्ण आणि असुरक्षित बांधकामही एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. राजापूरपासून सुरू असलेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गिट्टी टाकलेली असून, तेथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही. रात्रीच्या अंधारात चेतावणी फलक, रेडीयम संकेत अथवा प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. सदर कंत्राटाचे काम तिरोडा येथील एका कंत्राटदाराकडे असून, याप्रकरणी योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.