वाशिम,दि.२४ एप्रिल- जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येचा तातडीने सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी संबंधित विभागांना काटेकोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, वैशाली देवकर सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, “गावागावांतील टंचाईग्रस्त भागांची तातडीने यादी तयार करा आणि त्याठिकाणी नियमितपणे टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुनिश्चित करा. कोणत्याही गावात पाणीटंचाईमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या.”
तसेच, त्यांनी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देताना सांगितले की, “जलसंधारणाच्या विविध योजना – जसे की बंधारे, जलशुद्धीकरण प्रकल्प, शेततळ्यांची निर्मिती, पाणलोट क्षेत्र विकास – यांचा प्रभावीपणे अंमलबजावणी करा. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज भागवता येईल.”
पाण्याच्या वापराबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित करत त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, “पाण्याचा अपव्यय टाळा, वर्षा पाणीसंचयास प्राधान्य द्या आणि जलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करा.”
या बैठकीत प्रत्येक तालुक्यातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, उपाययोजना व आवश्यक गरजा यावर सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाने ठोस कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी त्वरित करण्याचा निर्धार व्यक्त केला.