नवेगावबांधमध्ये महिलांचा घागर मोर्चा

0
33

 अर्जुनी मोरगाव- तालुक्यातील नवेगावबांध येथे गेल्या काही आठवड्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू असून, नळाला पाणी येण्याचा वेळ, प्रमाण आणि दाब अनियमित असल्याने गावातील महिलांचा रोजचा जगण्याचा लढाच सुरू आहे. या त्रासाला कंटाळून अखेर गावातील महिलांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून घागर मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ते रेवचंदजी शहारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर जोरदार मोर्चा निघाला. महिलांच्या हातात घागरी, डोक्यावर हंडे, आणि मुखात संतप्त घोषणा… या दृश्याने संपूर्ण नवेगावबांध दणाणून गेले. ‘पाणी आमचं हक्काचं आहे!’, ‘ग्रामपंचायत जागी हो!’, ‘पाणी नाय, तर मत नाय!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज लांब अंतर पार करावे लागत आहे. काही ठिकाणी पाण्याचा नळ आठवड्यातून एकदाच चालू होतो, तर काही ठिकाणी पाणीच पोहचत नाही. वृद्ध, लहान मुलं, आजारी व्यक्ती – सगळ्यांनाच या संकटाचा फटका बसतोय.या मोर्चात सहभागी झालेल्या एक महिलेनं म्हटलं, ‘घरात लहान मुलं रडतात, आजारी माणसं पाण्याअभावी त्रस्त आहेत. आम्ही नळ कधी येतो याची वाट बघत उभ्या राहतो. पण प्रशासनाला त्याचं काहीच सोयरसुतक नाही.’ग्रामपंचायत कार्यालयात मोर्चेकर्‍यांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसचिवांना निवेदन दिलं. पाणीपुरवठा सुरळीत करावा, प्रत्येक वॉर्डात नियमित पाण्याची सोय व्हावी, टँकर वापरून तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रशासनाकडून ‘लवकरच उपाययोजना करू’ असं आश्वासन दिलं गेलं, पण ग्रामस्थांमध्ये विश्वासाचा अभाव दिसून आला. अनेकांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ‘हा प्रश्न केवळ पावसाळ्यात सोडवायचा नाही, तर वर्षभरासाठी कायमस्वरूपी उपाय हवा.’ हा मोर्चा गावकर्‍यांच्या सब्राचा विस्फोट होता. आता प्रश्न असा आहे की, ग्रामपंचायत केवळ आश्वासनं देणार की खरोखर काहीतरी करणार? नवेगावबांधच्या लोकांना उत्तर हवंय – तेही कृतीच्या स्वरूपात. पाणी टंचाईचा सामना करणार्‍या येथील प्रभाग क्रमांक चार, पाच, सहा, दोन या प्रभागातील आबालवृद्ध, विद्यार्थिनी, महिला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या.

उपसरपंच रमण डोंगरवार, ग्रामविकास अधिकारी विलास रामटेके यांच्याशी मोर्चेकर्‍यांनी चर्चा केली. (Women Ghagar Morcha) उद्याला प्रत्येक प्रभागामध्ये पिण्याचे पाणी मिळण्याची व्यवस्था आपण करू,असे आश्वासन ग्राम विकास अधिकारी रामटेके यांनी संतप्त महिलांना दिले. उद्या ही पाण्याची समस्या जर मिटली नाही,तर आणखी आम्ही घागर मोर्चा घेऊन येऊ व तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी संतप्त मोर्चेकरी महिलांनी दिला.

यावेळी रेवचंद शहारे , नानाजी साखरे, कलाबाई डोंगरवार, प्रियंका मस्के, फुलाबाई बडोले, वेणू तलांजे, आर्या मस्के, मालन मेश्राम, ताराबाई मेश्राम, शिशुबाई लोगडे या मोर्चेकरी महिला यांनी पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याची यावेळी चर्चेत मागणी केली.

गेल्या तीन चार महिन्यापासून प्रभाग क्रमांक तीन, चार,पाच,सहा व दोन मध्ये पाण्याची खूपच कृत्रिम पाणी टंचाई आहे. या  समस्येकडे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो परंतु याकडे ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष व हलगर्जीपणा दिसून येतो. अखेर महिलांना घागर मोर्चा काढावाच लागला. आता तरी ग्रामपंचायत याकडे लक्ष देऊन पाणी समस्या दूर करेल अशी अपेक्षा आहे. आश्वासन दिल्यानंतर पुढे ही समस्या जर आणखी कायम राहिली तर यानंतर आणखी आंदोलन तीव्र करण्यात येईल.
-रेवचंद शहारे, सामाजिक कार्यकर्ते, नवेगावबांध.