गोरेगाव : स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आवास प्लस योजनेच्या सर्वेक्षणाकरिता सभापती चित्रकला चौधरी व माजी सभापती मनोज बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. मोदी आवास व पीएमवाय योजनेंतर्गत ज्या गरजू लाभार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत, अशा लोकांकरिता महाराष्ट्र सरकारने शेवटची संधी म्हणून ग्रामपंचायतअंतर्गत प्रत्येक गरजू नागरिक घरकुलपासून वंचित राहू नये म्हणून आवास योजनेचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. हे सर्वेक्षण लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याने पंचायत समिती सभापती व माजी सभापती यांनी पुढाकार घेऊन सरपंच, ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर यांचा आढावा घेऊन लवकरात लवकर सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. आढावा बैठकीला सभापती चित्रकला चौधरी, माजी सभापती मनोज बोपचे, खंडविकास अधिकारी गौतम, विस्तार अधिकारी बिसेन व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.