महामार्गावर डंपर कारचा भीषण अपघात, पाच जण बचावले

0
59
नांदगावपेठ (Amravati) :- गिट्टीची भरधाव आणि अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या डंपरने क्रेटा कारला जबर धडक दिल्याने शनिवारी महामार्गावर भीषण अपघात झाला. कारमधील बलून अ‍ॅक्टीव्ह झाल्याने कारमधील पाच जणांचे प्राण वाचले सुदैवाने कुणालाही जीवितहानी पोहचली नाही. मात्र कारमधील पाचही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिझीलॅण्ड समोर आज २६ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हा भिषण अपघात घडला. घटनेनंतर चालक वाहन घटनास्थळावरच सोडून पसार झाला.
 मोर्शी येथील रहिवासी शैलेश प्रफुल्ल मालवीय हे आज त्यांचे वडील, जवाई, बहीण व ३ वर्षाच्या मुलासह एमएच-२७-डीएल-२६१ क्रमांकाच्या क्रेटा कारने पुण्याला जाण्यासाठी निघाले. क्रेटा कार नांदगावपेठ पोलिस ठाण्यात बिझीलॅण्ड जवळील रेवा हॉटेल समोर आली असता  गिट्टीचा एमएच-२७-डीटी ७०७७ क्रमांकाच्या ट्रकने क्रेटा कारला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की क्रेटा कार दोन वेळा पलटी होऊन पुन्हा सरळ झाली. कार पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली असून डंपरने पुलाची संरक्षण भिंत देखील खचली.कारमधील बलून अचानक अ‍ॅक्टीव्ह झाल्याने कारमधील शैलेश मालवीयसह पाच जणांचे प्राण वाचले. पाचही जण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर (Accident) चालक घटनास्थळावर वाहन सोडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच नांदगावपेठचे ठाणेदार महेंन्द्र अंभोरे तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सर्व पाचही जखमी  उपचारासाठी खाजगी रूग्णालयात गेले.अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड वाहतूक (Transportation) कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.