आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

0
38

सडक अर्जुनी,दि.२८ः-अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव, अर्जुनी-मोर.,सडक/ अर्जुनी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने वादळ वा-यांसह हजेरी लावल्याने मका पिके व उन्हाळी धानपिकांचे मोठे नुकसान होत आहे.ऐन कापनी व मळणिच्या मौसमात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.याबाबत या विभागाचे आमदार व माजी मंत्री ईंजी.राजकुमार बडोले यांनी प्रत्येक्ष शेतक-यांचे बांधावर जावुन पहाणी केली.व उपविभागीय अधिकारी,तसेच अर्जुनी-मोर, गोरेगाव, सड़क/अर्जुनी येथील तहशिलदारांना भ्रमणध्वनीवर सुचना करुन नुकसानग्रस्त शेतीचे त्वरीत पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याच्या सुचना दिल्या.

सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा व खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

पाहणी दरम्यान आमदार राजकुमार बडोले यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून, नुकसानग्रस्त पिके व घरे यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासन व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे तालुक्यात शेतकरी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वांच्या सहकार्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावर अहवाल सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही आमदार राजकुमार बडोलेनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, पंचायत समितीचे माजी उपसभापती शालिंदर कापगते, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, पंचायत समिती सदस्या सपना नाईक, किशोर बावनकर, ईश्वर कोरे, प्रल्हाद वरठे, ग्रामपंचायत राका उपसरपंच मधुसूदन दोनोडे, चिखली सरपंच चित्रा भेंडारकर, कनेरी ग्रामपंचायत सरपंच ज्योती पाऊलझगडे, कोकणा ग्रामपंचायत सरपंच अमर रोकडे, तसेच डिलेश सोनटक्के, दिपक गहाणे, माधोराव वाढई, विवेक भेंडारकर, सुधीर शिवणकर, अनिल बोरकर, मधुकर मेंढे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे सडक अर्जुनी तहसीलदार इंद्रायणी गोमासे, तालुका कृषी अधिकारी लिलाधर पाठक, संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक व इतर कर्मचारी देखील पाहणीदरम्यान उपस्थित होते.