सेवा हक्क दिन साजरा
परभणी, दि. 28 : नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015’ लागू केला आहे. त्याची सर्व कार्यालयांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जनतेला तत्परतेने सेवा द्याव्यात, अशी सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या दशकपूर्तीचे औचित्य साधून सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, आदींसह विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी उपस्थितांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा आणि शासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणणारा एक महत्त्वाचा कायदा आहे. सेवा देताना जनतेला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही, याची दक्षता कार्यालयांनी घ्यावी. यावेळी त्यांनी ऑनलाईन सेवा प्रणाली चांगल्या पध्दतीने राबविल्याबद्दल गौरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन इतर कर्मचाऱ्यांनी देखील त्यांचे अनुकरण करण्याची सूचना केली.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी यांनी केले ते म्हणाले की, जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत जनतेला विविध सेवा पुरविल्या जातात. महसूल विभागाच्या एकूण 20 सेवा या अधिसूचित कलेल्या आहेत. तसेच सर्व विभागांच्या 1027 सेवा या अधिसूचित केलेल्या आहेत. 527 सेवा सध्या ऑनलाईन आहेत. महसूल विभागाकडे दि. 31 मार्च 2025 अखेर 4 लाख 61 हजार 965 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 4 लाख 16 हजार 196 अर्ज मुदतीत निकाली काढण्यात आलेले आहेत. तर 19 हजार 913 अर्ज मुदतीनंतर निकाली काढले आहेत. या अधिनियमाच्या दशकपुर्तीनिमित्त जिल्हा, तालुका व ग्राम स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
ऑनलाईन सेवेत उत्कृष्ट केल्याबद्दल यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी आर.व्ही. नलवाड, जी.एस. गीते, विनोद टोंपे, श्रीमती एस.एस. सुर्यवंशी आणि के.आर. गाढवे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

