चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचे दागिने केले लंपास

0
63

गोंदिया,दि.२९ : बाहेरगावी जात असताना सुरक्षा म्हणून पायमोज्यात ठेवलेले दागिने हुशार चोरट्यांनी लंपास करून नेल्याची घटना २६ ते २७ एप्रिल दरम्यान रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत गड्डाटोली परिसरातील जनकनगर येथे घडली. चोरट्यांनी एकूण ७५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहे. सरिता मनोज टेंभरे (४८, रा. शिवाजी वॉर्ड, जनकनगर) २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बाहेरगावी गेल्या होत्या. अशात दागिने सुरक्षित रहावे म्हणून त्यांनी दागिने पायमोज्यात ठेवले व तो पायमोजा ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवला. दरम्यान, घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचा कोंडा तोडून ४० ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र किंमत २८ हजार, एक जोडी सोन्याचा झुमका २ ग्रॅम वजनाचा किंमत दोन हजार, एक जोडी टॉप्स २ ग्रॅम वजनाचे किंमत दोन हजार, २ जोडी लटकन ५ ग्रॅम वजनाचे किंमत पाच हजार, सोन्याचा ब्रेसलेट ५ ग्रॅम वजनाचा किंमत पाच हजार, सोन्याच्या तीन साखळ्या १२ ग्रॅम वजनाच्या किंमत १२ हजार रुपये, दोन नथ २ ग्रॅम वजनाच्या किंमत दोन हजार, सोन्याचा एक सिक्का १० ग्रॅम वजनाचा किमत १० हजार रुपये, सोन्याचे गोल मणी ३ ग्रॅम वजनाचे किंमत तीन हजार, एक जोड चांदीची पायल २० ग्रॅम वजनाची किंमत दोन हजार, एक जोडी चांदीचे बिछवे ५ ग्रॅम वजनाचे किंमत ५०० रुपये, चांदीचा एक सिक्का ५ ग्रॅम वजनाचा किंमत ५०० रुपये, सोन्याचे एक डोरले २ ग्रॅम वजनाचे किंमत दोन हजार रुपये असे एकूण ७५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३३१, (३), ३३१ (४), ३०५ (ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे