शेतकरी व सर्वसामान्यातेच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या मोर्चा

0
16

गोंदिया/सडक-अर्जुनी दि.27: गोंदिया व सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसिलदारांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. गोंदिया येथील रेलटोलीस्थित कार्यालयातून तर सडक अर्जुनी येथे स्थानिक त्रिवेणी हायस्कूल येथून मोर्चाची सुरूवात करण्यात आली. हा मोर्चा बाजारवाडीमार्गे तहसील कार्यालयावर पोहचला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत घेऊन तालुक्यातून आलेल्या शेतकरी, शेतमजुरांना संबोधन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेता गंगाधर परशुरामकर, गोंदिया जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि.प.सदस्य मिलन राऊत, जीवनलाल लंजे, देवचंद तरोणे, सडक-अर्जुनीचे नगराध्यक्ष रिता लांजेवार, किशोर तरोणे, सुभाष कापगते, छायाताई चव्हाण,अविनाश काशीवार, सरपंच शिवाजी गहाणे, प्रभू लोहिया, गजानन परशुरामकर आदींनी मार्गदर्शक केले. गोंदिया येथील मोर्च्यात गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आमदार दिलीप बनसोड,राजलक्ष्मी तुरकर,जितेश टेंभरे,खुशबू टेंभरे,छोटुभाऊ पटले,पुरणसिहं उके,लता रहागंडाले,शिव शर्मा,अशोक शहारे,अशोक गुप्ता,रफीक खान,विनोद पटले,जगदिश बहेकार,संजीव राय आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देवून त्यांचा ७/१२ कोरा करावा, शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांचे विंधन विहीरीवर वीज जोडणी घेऊन रबी पिकाची लागवड केली, पण लोडशेंडीगच्या त्रासामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे धानपिकाचे नुकसान झाले, त्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, शासकीय हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करुन प्रतीक्विंटल ५०० रुपये बोनस द्यावा, शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चऐवजी ३० जून पर्यंत वाढवावी आदी मागण्या घेऊन सडक-अर्जुनीचे नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन डॉ.अविनाश काशीवार यांनी तर आभार एफ.आर.टी.शहा यांनी मानले.