नागपूर -विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेतर्फे येत्या १४ व १५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे. वर्धा येथील स्वाध्याय मंदिरात हे संमेलन होणार असून यात संपूर्ण महाराष्ट्रातून साठ ते सत्तर लेखक, कवी आणि वक्ते सहभागी होणार आहेत.
विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे वर्धा येथील प्रतिनिधी प्रदीप दाते आणि वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे. शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर दोन प्रकट मुलाखती व एका कविसंमेलनासह विविध विषयावरील परिसंवादही घेतले जाणार आहेत. ‘लेखनाची वाट शोधताना’, ‘आमच्यासमोरील आव्हाने आणि आमचे लेखन’, ‘आमचे आदर्श आणि आम्ही ः एक अनुबंध’ या विषयावर परिसंवाद होतील. संमेलन एकूण आठ सत्रात विभागले गेले असून अस्वस्थ वर्तमान या आशयसूत्रात संमेलन बांधले गेले आहे.
विदर्भ साहित्य संघातर्फे यापूर्वी पुसद आणि लाखनी येथे विदर्भ पातळीवरील दोन युवा साहित्य संमेलने घेण्यात आलेली आहेत. मागील वर्षी नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात राज्यस्तरीय लेखिका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच धर्तीवरील हे युवा संमेलन असून महाराष्ट्रात यापूर्वी असे आशयानुवर्ती युवा साहित्य संमेलन झालेले नसल्यामुळे या संमेलनाचे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.