स्वच्छ सुंदर गावांची संकल्पना अमलात आणा

0
21

अर्जुनी मोरगाव,दि.03 : स्वच्छ व सुंदर गावांची संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यांनी तथा ग्रामसचिवांनी सामूहिक प्रयत्न करावे. गाव स्वच्छ व सुंदर झाले तर आरोग्य सुदृढ देते. त्यासाठी प्रत्येक ग्रामवासी तथा ग्रा.पं. कमिटीने सामूहिक प्रयत्न करावे, असे अवाहन अर्जुनी मोरगाव पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर यांनी केले आहे.बचत भवन पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथे आयोजित स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान कार्यशाळा तथा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला उपसभापती करुणा नांदगावे, जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, नाजुका कुंभरे, आशा झिलपे, सहा. गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलीत करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान संदर्भात विस्तृत माहिती देऊन हे अभियान राबविण्यासाठी ग्रा.पं. सरपंच सचिव यांची भूमिका व पुरस्कृत ग्रा.पं.साठी देण्यात येणारे पुरस्कार या विषयी सविस्तर माहिती देऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून वर्ष २०१७-१८ मध्ये संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानात तालुकास्तरावरून पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार ग्रा.पं. सिरेगावबांध एक लाख रुपयाचा पुरस्कार सरपंच हेमकृष्ण संग्रामे, सचिव टी.टी. निमजे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यापूर्वी सिरेगावबांध ग्रा.पं.ला स्मार्ट गावचा १० लाखांचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला, हे विशेष. द्वितीय पुरस्कार ग्रा.पं. दाभना ५० हजार रुपये सरपंच डॉ. दीपक रहेले व सचिव सी.जी. बागडे तर तृतीय पुरस्कार ग्रा.पं. मांडोखाल २५ हजार रुपये सरपंच शारदा करपते, सचिव पी.एल.चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कृत ग्रा.पं. सरपंचवासीयांचा शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला. कार्यशाळेचे प्रास्ताविक सहा. गटविकास अधिकारी मयूर अंदलेवाड यांनी केले. संचालन व आभार विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी मानले.