मराठवाड्यात तीन महिन्यांत 207 शेतकरी आत्महत्या

0
30

औरंगाबाद – मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गेल्या तीन महिन्यांत शेतकरी आत्महत्यांनी दोनशेचा आकडा ओलांडला आहे. एकूण 207 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे.

राज्यात सत्तापरिवर्तन झाले, तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नसून सत्तांतरापूर्वी कायम असलेले प्रश्‍न आजही कायम असल्याने सातत्याने शेतकरी आत्महत्या होत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाचा समारोप करताना औरंगाबाद विभागीय कार्यालयाने जाहीर केलेल्या शेतकरी आत्महत्यांची सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातच असल्याचे मार्चअखेर स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात एक जानेवारी ते 27 मार्चदरम्यान झालेल्या 207 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत एकट्या बीड जिल्ह्यातील 62 शेतकऱ्यांचा समावेश आहे. बीडपाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात 34, नांदेड जिल्ह्यात 33, औरंगाबाद जिल्ह्यात 31, लातूर जिल्ह्यात 20, परभणी जिल्ह्यात 12, हिंगोली जिल्ह्यात आठ, तर जालना जिल्ह्यातील सात शेतकरी आत्महत्यांचा त्यात समावेश आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांपैकी 108 प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र, तर 38 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. 71 शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी चौकशीत प्रलंबित असल्याची माहिती आहे.
उत्पादन कमी होऊनही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, त्यात सततची नापिकी, दुष्काळाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला. त्यातच अवकाळी पावसाने रब्बीच्या आशांनाही सुरूंग लावला. त्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याची वस्तुस्थिती आहे.
मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आजपर्यंत एक कोटी आठ लाख रुपयांची मदतवाटप करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या वतीने देण्यात आली