चेंबूरमधील कोंबडीचोर जुहूतील 9 मजली इमारतीत कसा राहतो?

0
33

मुंबई- वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचे कसलेही आव्हान नाही. राणेंचं आव्हान असूच शकत नाही. या निवडणुकीत एमआयएम दुस-या तर राणे तिस-या क्रमांकावर राहतील अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना चिथावले आहे. चेंबूर नाक्यावरचा कोंबडीचोर जुहूतील 9 मजली इमारतीत राहतोच कसा असा सवालही राऊतांनी विचारला आहे.
वांद्रे (पूर्व) निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. आज व उद्या शनिवार-रविवारची सुटी असल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरु केला आहे. कोकणातील खासदार विनायक राऊत यांनीही आज वांद्रेतील काही भागात प्रचार केला. त्यावेळी बोलताना राऊतांनी राणेंवर प्रहार केला. नारायण राणेंनी दोन दिवसापूर्वी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. मुंबई महापालिका हे उद्धव ठाकरेंचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याची टीका राणेंनी केली होती. त्याला राऊतांनी आज प्रत्त्युत्तर दिले. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी चेंबूर नाक्यावर कोंबडीचोर असणारा आज जुहू-चौपाटीसारख्या पॉश इलाक्यात 9 मजली इमारतीत कसा राहतो याचे उत्तर द्यावे असे सांगितले. राणेंकडे आलेला पैसा जादूतून कमावला की तेलगी प्रकरणातून कमविला ते सांगावे. राणेंसारखा स्वार्थी व खादाड वृत्तीचा माणूस दुस-याला शहाणपण शिकवतो याचेच आश्चर्य वाटते पण आता तो त्यांचा धंदाच झाला असल्याची टीकाही राऊतांनी केली.