शिक्षकांच्या विविध मागण्यासांठी प्राथ.शिक्षक संघाने दिले धरणे आंदोलन

0
26

गोंदिया,दि.08ः,प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर 7 सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले.त्यात सहाव्या वेतन आयोगाचे पाचही हप्ते जी. पी. एफमध्ये जमा करावे. १५०० प्रोत्साहन भत्ता विनाअट सर्वांना देण्यात यावा, अतिरिक्त घरभाडे लागू करण्यात यावे, केंद्रप्रमुखाच्या रिक्त जागा भराव्यात, सेवा निवृत्त शिक्षकांकडून वसूल करण्यात आलेली संगणक अर्हता प्राप्त न केल्याबाबतची वसुली परत करावी, देय रजा मंजूर करून तीन दिवसांचे वेतन देण्यात यावे, अशा मागण्यांचा समावेश होता.प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे,विभागीय अध्यक्ष नुतन बांगरे,अनिरुध्द मेश्राम,सुधीर बाजपेयी,नागसेन भालेराव,यशोधरा सोनवाने,सुरेश रहागंडाले,शंकरलाल नागपूरे,वाय.एस.मुंगलमारे,गणेश चुटे,चंद्रशेखर दमाहे,अरुण कटरे,वाय.बी.पटले,हेमंत पटले,राजेश निबांर्ते,पी.एस.लोथे,सुमेधा गजभिये,कुुमुद शहारे, चेतन उईके आदी शिक्षक शिक्षिका आंदोलनात सहभागी झाले होते.

गणित विषय शिक्षकांच्या जागा भराव्यात, अप्रशिक्षीत शिक्षण सेवकांची शिक्षण सेवक पदावर व्यथित कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावा, शालेय विद्युत देयक ग्राम पंचायतीकडून भरण्यात यावे, प्राथमिक शिक्षकांना सामूहिक विम्यात समाविष्ट करावे, शाळांना ४ टक्के सादिल अनुदान देण्यात यावे, सडक अर्जुनी पंचायत समितीत जीपीएल आणि एलआयसीची अपहार झालेली रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाला शिक्षण सभापती रमेश अंबुले,प्रभारी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी भेट देत समस्यांचे निवेदन घेतले.शिक्षणाधिकारी यांनी आंदोलक शिक्षकांच्या सर्व मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने प्राथमिक शिक्षक संघाने आपले आंदोलन मागे घेतले.