ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन

0
20

मुंबई,दि.18(वृत्तसंस्था) – ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी आणि गुजराती चित्रपट, कार्यक्रमांमध्ये त्यांनी अभिनयाची छाप सोडली होती. डॉक्टर म्हणूनही ओळखले जाणारे लागू केवळ अभिनेते किंवा दिग्दर्शकच नव्हे, तर एक विचारवंत आणि समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. पिंजरा, खिचडी आणि शासन हे त्यांच्या सर्वात प्रसिद्ध मराठी चित्रपटांपैकी आहेत. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ईएनटी डॉक्टर होते श्रीराम लागू…

श्रीराम बाळकृष्ण लागू असे त्यांचे नाव असले तरीही कला क्षेत्रात त्यांना डॉक्टर या नावाने ओळखले जायचे. मेडिकल कॉलेजला जात असतानाच त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. याच दरम्यान, 50 च्या दशकात त्यांनी मुंबई विद्यापीठातून ईएनटी (कान, नाक, घसा) यामध्ये मेडिकलची पद्वी मिळवली. पुढील 6 वर्षे पुण्यात प्रॅक्टिस केली. यानंतर त्यांनी कॅनडा आणि इंग्लंडला जाऊन पुढील प्रशिक्षण घेतले. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात काम करताना श्रीराम लागू यांनी पुरोगामी नाट्य संघटना सुरू केली. तसेच समविचारी कलाकारांना सोबत घेऊन आपले विचार पुढे नेले. देवाला रिटायर करा अशी आरोळी करत त्यांनी पुरोगामी आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.

पहिले नटसम्राट

डॉक्टर लागू यांनी 100 पेक्षा अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 40 पेक्षा अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये अभिनय केले. तसेच 20 हून जास्त नाटकांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. परंतु, त्यांना पहिले नटसम्राट म्हणून नेहमीच ओळखले जाईल. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राटचे नाटक झाले तेव्हा पहिले नटसम्राट तेच होते. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलावयाचे झाल्यास त्यांच्या पत्नी दीपा लागू सुद्धा मुरलेल्या कलाकार आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लागू यांच्या नाट्य कारकीर्दीसाठी त्यांना फिल्मफेअर, कालिदास सन्मान, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अशा विविध पुरस्कार आणि सन्मानांनी गौरवण्यात आले.