नागपूर, दि. 18 : गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तातडीने देण्यासाठी सुमारे 13 कोटी 80 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे. कोकणातील धान खरेदीचे चुकारेही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानपरिषदेत दिली.विधानपरिषद सदस्य सर्वश्री रामदास आंबटकर, प्रा. अनिल सोले, नागोराव गाणार, गिरीशचंद्र व्यास आदी सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधीवर श्री. भुजबळ बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमत दराने आतापर्यंत 13 कोटी 80 लाख रुपयांचे वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील 13 हजार 338 शेतकऱ्यांकडून एकूण 5 लाख 1हजार 804 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धान खरेदीसाठी किमान आधारभूत किमत दराने 91.07 कोटी देय असून आतापर्यंत 9790 शेतकऱ्यांना 54.67 कोटी रक्कमेचे ऑनलाईन वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरित 22.62 कोटी रक्कमेचे वाटप लवकरात लवकर करण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जात आहे. त्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचाही समावेश आहे. याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव दरापेक्षा 500 रुपये प्रोत्साहन राशी देण्यात येणार आहे.धान ठेवण्यासाठी गोदामे भाडेतत्वावर घेऊन खरेदी केलेले धान सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.