• रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ,शिस्त स्वतःपासून सुरू करा
भंडारा, दि. 13 :- अधिकार व हक्कांबाबत नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत असतात ते असायलाही हवे मात्र आपल्या कर्तव्याबाबत आपण फारसे गंभीर दिसत नाही. कायद्याचे कसोशीने पालन करणे हे सुद्धा आपले मूलभूत कर्तव्यच आहे. मोटर वाहन कायदा हा आपल्याच भल्यासाठी असून रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा व शिस्तीचा भाग व्हावा असे प्रतिसादन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले.31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव विधी सेवा प्राधिकरण न्या. मनिष कोठारी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा व एस.टी. महामंडळाचे गजानन नागुलवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अतिशय लहान वयात आईवडील आपल्या पाल्यांच्या हाती वाहन देतात ही बाब चुकीची असल्याचे नमूद करून अरविंद साळवे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात वाहनांच्या तुलनेत परवाना धारक कमी आहेत यावरून अनेक जन विना परवाना वाहन चालवित आहेत ही सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. विना परवाना वाहन चालविणे बेकायदेशीर तर आहेच सोबतच अपघाताला निमंत्रण देणारे आहे असे ते म्हणाले.मोटर वाहन कायदा हा आपल्या भल्यासाठी असून दुचाकी चालवितांना हेल्मेट व चार चाकी चालवितांना सीट बेल्ट आवश्य लावावा असे आवाहन त्यांनी केले. रस्ता सुरक्षा हे एका दिवसाचे अभियान नसून नियमित आचरणात आणावी अशी जीवन सुरक्षा प्रक्रिया असल्याचे साळवे यांनी सांगितले.
कायदे पाळण्याबाबत आपण फार गंभीर राहत नसल्याचे नमूद करून मनीषा कोठारी म्हणाले की, कायद्याचा आदर करायला पाहिजे. नागरिक म्हणून आपण आपल्या हक्काबाबत जागृत तर असावेच सोबतच कर्तव्याची सुद्धा जाणिव ठेवावी. रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम पाळण्याची नागरिक म्हणून आपली जबाबदारी अधिक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अन्य कायद्याबाबतीत ही माहिती दिली. व सुरक्षित वाहन चालविण्याचा सल्ला दिला.भंडारा जिल्ह्यात 31 जानेवारी 2019 रोजी पर्यंत 2 लाख 62 हजार वाहन नोंद झाली होती. या वर्षी त्यात 12755 वाहनांची भर पडली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रतिदिवस 50 वाहन नोंद झाली. वाहन परवाना धारकांची संख्या 1 लाख 50 हजार आहे. मागील वर्षी झालेल्या अपघातात 146 व्यक्तींचा मृत्यू झाला. तर 566 व्यक्ती जखमी झाल्यात अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रास्ताविकात दिली.विलास ठाकरे, रवी गिते व गजानन नागुलवार यांची यावेळी भाषणे झाली. राज्य परिवहन महामंडळात विना अपघात 25 व त्याहून अधिक वर्ष सेवा करणाऱ्या वाहकांचा या यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.