रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

0
48

गोंदिया,दि.13: रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ आज 13 जानेवारी रोजी मोटार वाहन विभाग व जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण सभागृह, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे संपन्न झाला. हा रस्ता सुरक्षा अभियान 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत रस्ता सुरक्षा संबंधी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन राबविण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेविका भावनाताई कदम यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी अरुण खडसे, अदानी फाऊंडेशनचे विनोद शिरवाडकर, उप प्रादेशिक अधिकारी विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, विलास अहेर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा नियमांचे पुस्तक व पत्रकाचे विमोचन करण्यात आले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजनाबाबतची विस्तृत माहिती प्रास्ताविकेतून दिली. तसेच रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सर्वसामान्य जनतेस मोटार वाहन नियमांची व रस्ता सुरक्षाबाबतची माहिती देवून अपघाताची संख्या कशाप्रकारे कमी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.नगरसेविका भावनाताई कदम यांनी रस्त्यावर वाहन चालवित असतांना चालकांनी शिस्त अंगीकारणे काळाची गरज असल्याचे सांगून ओव्हर स्पीड व नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द कठोर कार्यवाही करण्याची गरज असल्याचे सांगितले.विनोद शिरवाडकर यांनी स्वत: अनुभवलेल्या अपघात प्रसंगाचे वर्णन करुन सर्व वाहन धारकांनी हेल्मेट व सीट बेल्ट धारण करण्याबाबतची आवश्यकता असल्याचे उपस्थितांना पटवून दिले.

तत्पूर्वी 11 जानेवारी 2020 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बाईक रॅली गोंदिया शहरातून काढण्यात आली व रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने घोषणा देण्यात आले.कार्यक्रमास गोंदिया शहरातील आधार महिला सामाजिक संस्था, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, वाहन विक्रेते, विमा प्रतिनिधी, वित्त संस्थांचे अधिकारी, मोटार ड्रायव्हींग स्कूल व्यवस्थापक, बस चालक, ट्रक चालक/मालक, गोंदिया शहरातील विविध शाळांचे/महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मोटार वाहन विभाग व वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. संचालन सीमा बैतुले यांनी केले, उपस्थितांचे आभार राहूल कुरतोटवार यांनी मानले.

00000