जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते हत्तीरोग निर्मूलन सामूहिक औषधोपचार मोहिमेला प्रारंभ

0
102

गडचिरोली,दि.25:- गडचिरोली जिल्हयातील हत्तीरोग दुरीकरण सामुहिक औषधोपचार मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. यावेळी त्यांनी  स्वत: औषधाच्या गोळया घेतल्या. राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमाअंर्तगत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील हत्तीरोगासाठी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयामध्ये हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (आय.डि.ए.) ग्रामीण भागात दिनांक 2 ते 12 मार्च व शहरी भागात दिनांक 2 ते 20 मार्च या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. सार्वत्रिक औषधोपचार मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.

सन 2005 पासून एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम गडचिरोली जिल्हयात राबविण्यात येत असून  अजुनपर्यंतही या रोगावर जिल्हयात 100 टक्के नियंत्रण मिळविता आले नाही. या मोहिमेत आजपर्यत फक्त डि.ई.सी. व अलबेंडाझोल या गोळया खाऊ घालण्यात येत होत्या, परंतु जिल्हयातील हत्तीरोगाचे प्रमाण लक्षात घेता राज्यशासनाने आयवरमेक्टीन युक्त नवीन प्रभावी औषधाचा उपयोग करुन हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याचे ठरविले आहे. आयवरमेक्टीन या गोळया लाभार्थ्याच्या उंचीनुसारच दिल्या जातात. व त्याची मोजमाप करण्याकरीता “डोज पोल” सारख्या आधुनिक व सोप्या प्रणालीचा उपयोग केला जाणार आहे. ही औषध 90 से.मी. पेक्षा कमी उंचीच्या लाभार्थीला तसेच गंभीर आजारी व गरोदर स्त्रीला दिल्या जाणार नाही. सदर मोहीम 2 ते 20 मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता गावांत दवंडी, ग्रामसभा, शाळा, कॉलेज, खाजगी संस्था महीला मंडळ, महिला बचत गट, वैदु, पाडा या ठिकाणी माहिती देण्यात येणार आहे. जेणेकरुन एक दिवसीय सामुदायिक औषधोचार मोहीमेबाबत प्रसिध्दी होईल. हे औषध आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवक यांच्या मार्फत मोफत वाटप करण्यात येईल.

हत्तीपाय रोगात क्युलेक्स डासाच्या दुषीत मादीमार्फत परोपजिवी जंतु पसरतात व निरोगी व्यक्तीच्या शरीरात परजिवी जंतु नर-मादी गेल्यावर हत्तीरोग होतो. परजीवी कृमीचा नायनाट करण्याकरीता Ivermectine, Diethylcarbamazine, Albendazole औषध शासनामार्फत उपलब्ध करण्यात आले आहे. या औषधाच्या सेवनामुळे हत्तीरोगाच्या कृमीचा नायनाट पुर्ण होतो. हा कार्यक्रम गोळया वाटपाचा कार्यक्रम नसून सगळया लाभार्थीला औषधोपचार प्रत्यक्ष खाऊ घालण्याचा आहे. याची दक्षता गोळ्या खाऊ घालणाऱ्या कर्तचारी यांनी घ्यावी असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.  या औषधापासून कसलाही दुष्परीणाम होत नाही. हत्तीरोग हा आजार मॉयक्रोफॉयलेरीया कृमीमुळे होतो. मॉयक्रोफॉयलेरीयाची कृमी दुषित क्युलेक्स मादी डासापासून माणसाच्या शरीरात प्रवेश करते. क्युलेक्स डासाची उत्पत्ती घाण पाण्यात होते. पायावर सुज येणे, हत्तीच्या पायासारखे पाय होणे, अंडवृध्दी होणे हे हत्तीरोगाची लक्षणे आहेत, असे डॉ. कुणाल मोडक, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रुडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर व इतर सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

चौकट : जिल्हयातील शहरी व ग्रामीण 10 लक्ष 33 हजार लोकसंख्येला हा डोज दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून 5334 कर्मचारी सहभागी होणार आहेत. हे औषध 90 से.मी. पेक्षा कमी उंचीच्या लाभार्थीला तसेच गंभीर आजारी व गरोदर स्त्रीला दिले जाणार नाही. 5 वर्षावरील सर्वांना हे औषध दिले जाणार आहे. याबाबत संबंधित आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी आल्यानंतर माहिती देणार आहेत.

आकडेवारी :  2017 मधील परिस्थितीनुसार महाराष्ट्रातील 17 जिल्हयांची नोंद लागणीचा धोखा असलेल्या जिल्हयांमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोलीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली हा हत्तीरोग प्राबल्य जिल्हाही आहे. त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणात हत्तीरोग प्रकारातील वेगवेगळया दोन प्रकारात अनुक्रमे 4669 व 3583 रूग्ण असलेले आढळून आले होते.