गोंदिया ,दि.27: राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयातील रूग्णवाहिकांच्या चालकांचे कंत्राट अश्कोम कंपनीला देण्यात आले. अश्कोम कंपनीकडून कंत्राटी पध्दतीवर गेल्या १० ते १५ वर्षांपासून चालक काम करीत आहेत. मात्र, अश्कोम कंपनी चालकांची पिळवणूक करीत आहे. एवढेच नव्हेतर दिलेले आश्वासन देखील पाळत नाही. कंपनीच्या अन्यायाविरूध्द गोंदिया जिल्ह्यातील रूग्णवाहिकेच्या कंत्राटी चालकांनी (दि.२६) पासून जि.प.कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. अश्कोम कंपनीचे कंत्राट संपुष्टात आणून एनएचएमच्या मार्फत नियुक्ती देण्यात यावी, अशी मुख्य मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
अश्कोम मिडिया प्रा.लि.भोपाळच्या माध्यमातून रूग्णवाहिकेचे चालक कंत्राट पध्दतीवर गेल्या १० ते १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. कंपनीकडून २४ तास काम करवून घेतले जात आहे. मात्र, मोबदला कमी दिला जात आहे. शासनाकडून १३ हजार ९०० रूपये प्रति चालक वेतन काढले जाते. तर प्रत्यक्षात ८ हजार ९०० रूपये वेतन देत आहे. एवढेच नव्हेतर पीएफ व इतर सोयी-सुविधांची कपात करूनही वेळेवर भरणा केले जात नाही. त्या संदर्भातील पावत्याही वाहन चालकांना दिले जात नाही. या अन्यायाविरूध्द मागील वर्षी रूग्णवाहिका चालकांनी आंदोलन केले होते. दरम्यान गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजा दयानिधी यांच्या समक्ष अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, अद्यापही त्या मागण्यांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राट कंपनीविरूध्द शासकीय रूग्णवाहिका, कंत्राटी वाहन चालक संघटनेच्या नेतृत्वात आजपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व रूग्णवाहिकेचे चालक सहभागी झाले आहेत. कंपनीचे कंत्राट काढून एनएचएम अंतर्गत चालकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.