भंडारा,दि.27:- जे.एम. पटेल महाविद्यालयात आज कवी कसूमाग्रज जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे आयोजन जे.एम. पटेल महाविद्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमूख प्रा,डॉ, राहुल मानकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस,एन, मोर महाविदयालय तुमसरचे मराठी विभागातील प्राध्यापक रेणुकादास उबाळे हे होते. प्रा. उबाळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून मराठी भाषेच्या इतिहास व मराठी भाषेचे संवर्धन यावर प्रकाश टाकला. यात प्रामुख्याने त्यांनी मराठी भाषा संवर्धन तथा मराठी भाषेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून कवी कुसुमाग्रज यांच्यापर्यंत लाभलेला वारसा व इतिहास यावर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात होणारा मराठी भाषेचा होणारा कमी वापर यावर खंत सुध्दा व्यक्त केली व आजच्या युगात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विद्यार्थी व तरुणानी पुढे येण्याचे आवाहन देखील यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयातील मराठी विभागातील सहयोगी प्रा.डॉ. उज्वला वंजारी यांनी केले तर कार्यक्रमाचे चलन व आभार प्रदर्शन प्रा. ममता राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता मराठी विभागाच्या विद्यार्थी यांनी प्रयत्न केले .जे.एम.पटेल महाविद्यालयात 1जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा घेण्यात आला होता .या पंधरवड्यात मराठी भाषा संवर्धनासाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवले गेले त्यात प्रामुख्याने काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, ग्रंथालयीन वाड.मय प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा तसेच अनेक महत्त्वाच्या स्पर्धाचे आयोजन महाविद्यातील मराठी विभागातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये क्रमशः पंकज पडोळे, समीक्षा भोगे, हिमांशु मेंढे, प्रथम क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयातील मराठी विभागतर्फे प्रमाणपत्र व चषक देवून त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.