गोरेगाव,दि.28- “मायमराठीचा जागर करतांना मराठी भाषेला ज्ञानभाषा व ई-भाषा म्हणून विकसित करणे सर्व मराठी माणसाचे आद्यकर्तव्य आहे”. अशाप्रकारचे मौलिक विचार स्थानिक जगत कला,वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे ‘मराठी वाङमय मंडळाव्दारा’ आयोजित कवी कुसुमाग्रजांच्या जयंतिप्रीत्यर्थ मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता या स्थानावरून शहिद जा. ति.जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा गोरेगावचे प्राचार्य एम.पी. शेख यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम होते तर विचारमंचावर मराठी विभागप्रमुख डाॅ. चंद्रकुमार राहुले, ग्रथंपाल प्रा. एकनाथ चंदनखेडे, डाॅ. प्रदीप जवादे, प्रा. लोकेश कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतीमेसमोर दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून साहित्य चळवळीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्राचार्य एम. पी. शेख यांचा मराठी वाङमय मंडळव्दारे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे विचार व्यक्त करताना एम. पी.शेख म्हणाले की,”आज मराठी भाषा मराठी माणसाच्या जीवनातून लुप्त होत आहे ही चिंतेची बाब आहे,मराठी भाषा संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात मराठीचा नित्य वापर करणे गरजेचे आहे”.अध्यक्षीय भाषणातून उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम यांनी “मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे जास्त काळ चिरकाल टिकून राहते, करीता आपल्या मातृभाषेचा सर्वांनी स्वाभिमान बाळगून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच घ्यावे”. अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. चंद्रकुमार राहुले तर सूत्रसंचालन प्रा. लोकेश कटरे तर आभार प्रा. एकनाथ चंदनखेडे यांनी मानले. या कार्यक्रमात डाॅ.रविप्रकाश चंद्रीकापुरे, नंदकिशोर कटरे, वैष्णवी रहांगडाले, रोहीत पारधी, संदीप पारधी, पूनम कटरे व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.