चंद्रपूर,दि.29ः-2021 मधे होवू घातलेल्या सार्वत्रिक जनगणनेमधे ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी देशभर वातावरण तापू लागले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातही विविध मार्गाने शासनावर दबाव तयार करण्यात येत आहे व समाजात जागृती सुरु आहे.
2021 च्या सार्वत्रिक जनगणनेमधे ओबीसी प्रवर्गाचा जातनिहाय रकाना नाही, तर आमचा जनगणनेत सहभाग नाही, असे लिहिलेल्या पाट्या लग्नसोहळ्यात वधू-वर व पाहूणे मंडळीच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या तथा पाट्यांचे आदान-प्रदान करण्यात आले. यामाध्यमातून समाजात संदेश पोहोचवून ईशारा देण्यात आला आहे की ओबीसी प्रवर्गाचा जातनिहाय रकाना नसल्याने ओबीसी समाजाने जनगणनेत सहभाग घेवु नये.
देवराव पैकनजी दिवसे यांची मुलगी डॉ. मृणाली व देविदास विठ्ठलराव ठेंगणे यांचा मुलगा डॉ. तुषार यांचा स्थानिक नागपुर महामार्गावरील शकुंतला फार्म येथे नुकताच (दि.26) ला विवाह संपन्न झाला.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या भाचीचा हा विवाह सोहळा होता.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाचे जिल्हा अध्यक्ष श्याम लेडे व ईतर मान्यवर उपस्थीत होते.
सध्या जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमात ओबीसी जनगणनेचा विषय चर्चेचा व आंदोलनाचा बनत चालला आहे.