नाशिक, दि. 18 : राज्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी सद्भावनेतून पुढाकार घेऊन लॉकडाऊन केले, मात्र त्यातून काही हाती लागत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या विरोधात आपली भूमिका नसून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर भर आहे; पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तज्ञांसमवेत नाशिक दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी लॉकडाऊन तसेच इतरही अनुषंगिक निर्णय मुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून घेतले जातील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते.
या बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम माने, महानिरीक्षक छेरिंग दोरजे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, मुंबई प्रमाणे नाशिक शहरातील प्रत्येक दवाखान्यासाठी महापालिकेने संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करावी व रुग्ण व्यवस्था, प्रवेश, बिल्स, इत्या
नाशिक महानगरपालिकेने आपल्या रूग्णालयांमध्ये आयसीयु युनिट वाढवावेत. तसेच त्यासाठी तज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात याव्यात व नर्सेस इत्यादी स्टाफ कायमस्वरूपी वेतन पटलावर घेण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी दिल्या. एसएमबीटी रूग्णालयामध्ये मध्ये १०० बेडसची व्यवस्था करण्यात यावी व पुढील आठवड्यात त्याठिकाणी रुग्ण दाखल करण्यास सुरुवात करावी.
जिल्ह्यातील कुठलाही रुग्ण उपचारविना राहता कामा नये. कोमॉर्बीड रुग्णाबाबत अधिक दक्षता घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात. जिल्ह्यातील डेथ रेट कमी करण्याबाबत अधिक प्रयत्न व्हावा, महाराष्ट्राच्या तुलनेत नाशिकचा डेथ रेट कमी असला तरी तो अजून कमी करण्याबाबत प्रशासनाला सूचना देताना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, एक सुद्धा मृत्यू होता कामा नये अशा सूचना शासनाच्या आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत आपण जिल्ह्यात कमी डेथ रेट आहेत यावरही समाधानी न राहता तो शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
लॉकडाऊन करण्याची अनेक नागरिकांची मागणी आहे तर लॉकडाऊन करू नये अशीही अनेक नागरिकांची मागणी आहे. लॉकडाऊन किती वेळा करावा हा प्रश्न आहे. तसेच ज्या ठिकाणी लॉकडाऊन नव्याने सुरू करण्यात आले आहेत या ठिकाणी देखील कोरोनाची साखळी तुटलेली नसून उलटपक्षी लॉकडाऊनच्या भीतीने झालेल्या गर्दीतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले. अर्थचक्र नव्याने सुरू करण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे.
शहर व जिल्ह्यात बेडची संख्या मुबलक प्रमाणात आहे. जिल्हा रुग्णालयात अधिक ४० व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात यावी. ठक्कर डोममध्ये भविष्यातील संकटाचे पूर्वनियोजन म्हणून व्यवस्था करण्यात येत आहे, मात्र अद्याप आपल्याकडे कोरोना केअर सेंटरचे १२०० बेडस् शिल्लक असल्याने ते अपुरे पडल्यानंतर ठक्कर डोमसह इतर ठिकाणी जादा सोय करण्याचा विचार करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त श्री. गमे यांनी दिली. सध्या बिटको येथे नव्याने हॉस्पिटल तयार करीत असतानाच अस्तित्वात असलेल्या हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा पुरविण्यावर अधिक भर देण्याच्याही सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.
यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आपापल्या क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती सांगून पुढील नियोजनाच्या दिशा कशी असेल याबाबत पालकमंत्री यांना अवगत केले.