देसाईगंज--स्थानिक बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या शहरातील तीन चोरट्यांना अटक करण्यात देसाईगंज पोलिसांना यश आले आहे. राहुल बकाराम खरकाटे (वय २८), मुजशिर शब्बीर शेख (वय ३१), महेंद्रसिंग सुरजसिंग बावरी (वय ४६) सर्व रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज असे आरोपींचे नाव आहेत.
शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला लागून एटीएम आहे. या एटीएममध्ये शहरातील चोरट्यांनी १६ जून रोजी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच एटीएम रूममधील काचांची तोडफोड करून नुकसान केली. ही घटना उघडकीस येतात बँक मॅनेजर वैभव भोयर यांनी देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंज पोलिसांनी शहरातील आंबेडकर वॉर्डातील तीन संशयितांना पकडून चौकशी केली असता, प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी राहुल खरकाटे, मुजशिर शेख, महेंद्रसिंग बावरी या तिघांनीच संबंधित एटीएम लुटण्याचा प्रयत्न केल्याची बाब पुढे आली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक महेश मेर्शाम यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउपनी ज्ञानेश्वर लांडे, पोशि श्रीकृष्ण जूवारे, पोशि निकलेश सोनवणे यांनी केली.
|