गोंदिया : आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे दररोज आळी पाळीने स्वयंपाक करणाऱ्या एका मजूरांमध्ये बिर्याणी बनविण्यावरून निर्माण झालेल्या वादातून तरुणाने आपल्याच मित्रावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना 26 जून 2024 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. शेरसिंग मंगलसिंग उईके (वय 40 रा. बैगाटोला, ता. लामटा जि. बालाघाट, म.प्र. ) असे मृताचे तर बादल उर्फ रामचरण रामप्रसाद उईके (वय 31 रा. बैगाटोला, ता. लामटा जि. बालाघाट, म.प्र. ) असे आरोपीचे नाव आहे.
आमगाव तालुका मुख्यालयापासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या अंजोरा येथे कालव्याजवळ भारत गोकुळ मरसकोल्हे यांच्या शेतात बांबू डेपो आहे. या बांबू डेपोमध्ये बालाघाट जिल्ह्यातील बैगाटोला (धिमरुटोला) येथील काही मजूर बांबू कापण्याचे काम करतात. दरम्यान, शेरसिंग उईके व आरोपी बादल उर्फ रामचरण उईके हे दोघेही एकाच कॉर्टरमध्ये राहत असून आळी पाळीने स्वयंपाक करायचे. यानुसार घटनेच्या दिवशी 26 जून 2024 रोजी त्यांनी बिर्याणी बनविण्याचा बेत आखला. मात्र, रात्री 9 वाजताच्या सुमारास बिर्याणी बनवताना दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात बादलने शेरसिंगच्या छातीवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. यावेळी दोघांच्या वादाचा आवाज ऐकून घटनास्थळावर जमलेल्या इतर मजूरांनी 108 रुग्णवाहिका बोलावली.
मात्र, गंभीर जखमी झाल्याने शेरसिंगचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तासणीसाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी बांबू डेपोचे संचालक महेश भागचंद लिल्हारे (वय 27 रा. अंजोरा, ता.आमगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बादल उर्फ रामचरण रामप्रसाद उईके, याच्या विरोधात भादंवि कलम 273 कलम 302 नुसार गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. पुढील तपास आमगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक करीत आहेत.